चंद्रपूर : कोरोनामुळे या वर्षी पुन्हा लाॅकडाऊन करण्यात आले. त्यामुळे हजारो नागरिकांच्या हातचा रोजगार बुडाला आहे. अनेकांना जगण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे. दरम्यान, शासनाने अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत प्राधान्य गट तसेच अंत्योदयच्या लाभार्थ्यांना मोफत धान्य देण्याची घोषणा केली आहे. मात्र जिल्ह्यातील तब्बल ५९ हजार १५३ केशरी कार्डधारकांना कोणताही लाभ मिळत नसून ते सध्या रेशनच्या प्रतीक्षेत आहेत. मागील वर्षीनुसार आम्हालाही योजना सुरू करावी, अशी मागणी कार्डधारक करीत असून, अनेक जण स्वस्त धान्य दुकान तसेच पुरवठा कार्यालयात चकरा मारीत आहेत.
अन्न सुरक्षा योजने अंतर्गत जिल्ह्यात एपीएल कार्डधारकांची संख्या १ लाख ३७ हजार १४५ असून या माध्यमातून ५ लाख ११ हजार ७०० नागरिकांना तसेच प्राधान्य गट योजनेअंतर्गत २ लाख ६१ हजार ३१ कार्डवर १० लाख ३७ हजार ७०५ नागरिकांना मोफत अन्नधान्याचा लाभ लाॅकडाऊनच्या काळात मिळत आहे. यासोबतच प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गतही त्यांना प्रत्येकी ५ किलो धान्य मोफत दिले जात आहे. मात्र दुसरीकडे जिल्ह्यात ५९ हजार १५३ केशरी कार्डधारक असून १ लाख ८९ हजार ७७५ लाभार्थ्यांना एक दाणाही मिळत नसल्यामुळे सध्याच्या कोरोना काळातील बिकट स्थितीमध्ये त्यांच्यावर मोठा अन्याय होत आहे. सरकारने मोफत नाही, तर मागील वर्षीनुसार योजना जाहीर करून किमान स्वस्तामध्ये अन्नधान्य द्यावे. मागील वर्षी लाॅकडाऊनमनध्ये या कार्डधारकांना ८ रुपये किलो गहू तसेच १२ रुपये किलोने तांदूळ देण्यात आले होते. यामुळे काही प्रमाणात का होईना त्यांना आधार मिळाला होता. या वर्षी पुन्हा लाॅकडाऊन झाले. अनेकांच्या हातचा रोजगार गेला, मोलमजुरी करणाऱ्यांनाही काम नाही, त्यामुळे आर्थिक अडचणीत दिवस काढावे लागत आहेत. त्यामुळे शासनाने केशरी कार्डधारकांनाही आधार देणे गरजेचे आहे.
बाॅक्स
अनेकांची होत आहे निराशा
केशरी कार्डधारकांना अन्नधान्य मिळत नाही. मात्र मागील वर्षी योजनेअंतर्गत धान्य मिळत होते. दरम्यान, या वर्षी शासनाने मोठा गाजावाजा करून अंत्योदय तसेच प्राधान्य गटांना मोफत धान्य देण्याची घोषणा केली. तर गरीब कल्याण योजनेअंतर्गतही धान्य मिळत आहे. त्यामुळे केशरी कार्डधारकांनाही काही तरी मिळेल, या आशेने नागरिक स्वस्त धान्य दुकान तसेच पुरवठा कार्यालयांमध्ये चकरा मारत आहेत. मात्र त्यांच्या पदरी केवळ निराशा येत आहे.
बाॅक्स
मागील वर्षी लाॅकडाऊनमध्ये राज्य सरकारने ज्या शिधापत्रिकेवर धान्य मिळत नाही, अशा शिधापत्रिकाधारकांना तांदूळ १२ रुपये तसेच गहू ८ रुपये प्रमाणे वितरित करण्याचे आदेश निर्गमित केले होते. यामुळे काही प्रमाणात का होईना शिधापत्रिकाधारकांना आधार मिळाला होता. त्याच धर्तीवर या वर्षीसुद्धा योजना सुरू केल्यास दिलासा मिळेल, अशी केशरी कार्डधारकांची मागणी आहे.
बाॅक्स
अन्नसुरक्षा योजना अंतर्गत मिळतो लाभ
अंत्योदय योजना लाभार्थी - १ लाख ३७ हजार १४५
प्राधान्य गट लाभार्थी - २ लाख ६१ हजार ०३१
बाॅक्स
एपीएल केशरी कार्डधारक
५९ हजार १५३
कोट
कोरोना लाॅकडाऊनच्या काळामध्ये प्रत्येक माणूस सध्या अडचणीत सापडला आहे. यामधून मार्ग काढून गरजूंना मदत करणे गरजेचे आहे. केशरी कार्डधारकांनाही काही प्रमाणात धान्य मिळणे गरजेचे आहे. मागील वर्षीनुसार योजनेतून अन्नधान्य द्यावे, यासाठी आपण राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार आहोत.
- किशोर जोरगेवार
आमदार, चंद्रपूर