लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : इरई नदी चंद्रपूर शहराला सात किलोमीटर समांतर वाहते. अनेकांनी नियम धाब्यावर बसवून पूरग्रस्त भागातच घरे बांधल्याने यंदा प्रचंड फटका बसला. या नदीच्या लाल व निळ्या रेषेबाबत यापूर्वी मुंबई आयआयटीने सर्व्हे केला होता. या सर्व्हेची नव्याने पडताळणी केली जाणार आहे. ही पडताळणी अधिक शास्त्रोक्त झाल्यास भविष्यातील बाधित क्षेत्राचे नुकसान टाळण्याची आशा निर्माण झाली आहे.चंद्रपूर शहराचा विस्तार झपाट्याने होत आहे. जमिनीच्या किमती वाढल्याने अनेकांनी मिळेल त्या ठिकाणी कमी दरात जागा घेतल्या. काहींनी अतिक्रमण करून घरे बांधली. इरई नदी परिसराला लागून तयार झालेल्या वसाहती हा त्याचाच भाग असल्याचा आरोप पर्यावरणवादी संघटनांकडून केला जात आहे. नुकत्याच आलेल्या इरई नदीच्या पुरामुळे नागरिकांच्या मालमत्तेची प्रचंड हानी झाली. ही समस्या निकाली काढण्यासाठी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत आढावा बैठक झाली. यावेळी सहायक जिल्हाधिकारी रोहन घुगे, मनपा आयुक्त विपिन पालीवाल, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता पाटील, कार्यकारी अभियंता श्याम काळे, निवासी उपजिल्हाधिकारी विशालकुमार मेश्राम, देवराव भोंगळे उपस्थित होते. इरई नदीच्या लाल व निळ्या रेषेबद्दल यापूर्वी मुंबई आयआयटीने सर्व्हे केला होता. काही जमिनीवर इरई नदीच्या पुराचे पाणी पोहोचले नाही, अशाही काही जमिनी निळ्या लाईनमध्ये आल्या आहेत. हे क्षेत्र मोठे असल्याने नागरिक यात भरडले जाऊ नयेय. त्यामुळे चंद्रपूर महानगर पालिका व पाटबंधारे विभागाने सामूहिक सर्वेक्षण करून शास्त्रोक्त टिपणी तयार करण्यात येणार आहे. आयआयटीने केलेल्या सर्वेक्षणाची शासनाच्या एमआर-सॅट यंत्रणेकडून पुन्हा पडताळणी झाल्यास नियमानुसार घरे बांधणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळू शकेल.
इरईच्या १८९१ पासूनच्या पुराची स्थितीचंद्रपुरात ३ सप्टेंबर १८९१ रोजी पूर आला. या पुराची पठाणपुरा गेटवर १८३.०६ मीटर मार्किंग आहे. यानंतर जुलै १९१३ मध्ये १८०.०६ मीटर, ऑगस्ट १९५८ मध्ये १८१.३३ मीटर, सप्टेंबर १९५९ मध्ये १८०.८९ मीटर, ऑक्टोबर १९८६ मध्ये १८०.७६ मीटर मार्किंग असल्याची माहिती अधीक्षक अभियंता पाटील यांनी दिली.
चंद्रपुरात असेही काही भाग आहेत. जिथे निळी रेषा आहे, मात्र तेथे पाण्याचा एकही थेंब पोहोचला नाही. निळ्या रेषेने ४५० हेक्टर क्षेत्र बाधित होते. त्यामुळे आयआयटीच्या सर्वेक्षणाच्या पडताळणीची गरज आहे. याबाबत मुंबई येथे उपमुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित विभागाच्या प्रमुखांसोबत बैठक घेण्यात येईल.- सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री, वने व सांस्कृतिक कार्य मंत्री