गोवरी : राजुरा तालुक्यातील गोवरी, पोवनी, साखरी, सास्ती, गोयेगाव परिसरात वेकोलीने मातीचे महाकाय ढिगारे गावाच्या, शेताच्या लगत टाकले आहे. या मातीच्या ढिगाऱ्यावर मोठ्या प्रमाणात झुडपी जंगल निर्माण झाल्याने वन्यप्राण्यांचा या ठिकाणी वावर वाढला आहे. त्यामुळे हे मातीचे ढिगारे धोकादायक ठरत आहे.
गवराळा-घुग्घुस मार्ग दुपदरी करावा
भद्रावती : तालुक्यातील गवराळा ते घुग्घुसमार्गे पिंपरी देशमुख हा मार्ग दुपदरीकरण करण्यात यावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे. या मार्गावर अत्यंत वर्दळ राहत असल्याने हा मार्ग अपुरा पडत आहे.
गावांना रस्त्याची प्रतीक्षा
वरोरा : तालुक्यातील अनेक गावांसाठी रस्त्याचे बांधकाम करण्यात आले नसल्याने नागरिकांना पायवाटेनेच ये-जा करावी लागते. अनेक गावांत जाण्यासाठी पक्के रस्ते नाहीत. अनेकदा रस्ते तयार करण्याची मागणी करण्यात आली. मात्र, याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे. मात्र, याचा फटका नागरिकांना बसत आहे.
बल्लारपूर-सिरोंचा रेल्वे मार्ग तयार करा
बल्लारपूर : येथून सिरोंचापर्यंत रेल्वे मार्ग तयार करण्यात यावा, अशी मागणी चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांतील नागरिकांकडून होत आहे. हा मार्ग तयार झाल्यास बल्लारपूर, गोंडपिपरी, आष्टी, आलापल्ली, अहेरी, सिरोंचा नागरिकांना सोयीचे होणार आहे.
गोदरीमुक्त गाव मोहिमेचा फज्जा
पोंभूर्णा : परिसरातील अनेक गावांत गोवऱ्या, सरपणाची लाकडे, निरुपयोगी वस्तू नागरिक शौचालयात भरून ठेवतात. त्यामुळे ग्रामीण भागात शौचालयाचा गैरवापर होत आहे. गोदरीमुक्तीबाबत प्रशासनाकडून प्रभावी जनजागृती केली जात नसल्याने हे घडत आहे.
बाजारातील कचरा हटविण्याची मागणी
गडचांदूर : येथील रेल्वे फाटकाजवळ असलेला कचरा डेपो बंद करावा, अशी नागरिकांची मागणी आहे. मागील काही दिवसांपासून येथे मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात असल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
बुद्धगुडा गावातील समस्या सोडवा
जिवती : तालुक्यातील बुद्धगुडा हे गाव अनेक समस्येने ग्रासले आहे. या गावात अजूनही योग्य रस्ते नाही. त्यामुळे गावातील लोकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे हिमायतनगर ते बुद्धगुडा येथील समस्या सोडवाव्या. तसेच रस्ता तयार करण्याची मागणी गावातील नागरिकांनी केली आहे.
तोट्यांअभावी पाणी वाया
राजुरा : येथील नागरिकांकडे नळ आहेत; परंतु काही नागरिकांच्या नळाला तोट्या नाहीत. त्यामुळे ओव्हर फ्लो झाल्यानंतर, तसेच पाणी भरून झाल्यानंतर उर्वरित पाणी वाया जाते. स्थानिक प्रशासनाने प्रत्येक नागरिकांच्या नळाला तोट्या लावणे बंधनकारक करावे, अशी मागणी आहे.
पुलावर कठडे नसल्याने अपघाताचा धोका
कोरपना : कोरपना-गोविंदपूर-आदिलाबाद राष्ट्रीय महामार्ग असल्याने जड वाहनांची वर्दळ सुरू असते. याच मार्गावर धामणगाव येथे पूल बांधण्यात आला. परंतु, कठडे नसल्याने अपघाताचा धोका आहे. यापूर्वी येथे अपघात घडले असल्याचे वास्तव आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.
जड वाहतुकीवर बंदी घालण्याची मागणी
नागभीड : तालुक्यात रात्रीच्या सुमारास मोठ्या प्रमाणात जड वाहतूक सुरू असते. हा प्रकार जिल्ह्यातील काही भागात सर्रास सुरू असून, जड वाहतुकीमुळे रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.
वाहनावर मोबाईलचा वापर टाळा
सिंदेवाही : वाहन चालविताना मोबाईलवर संभाषण करणे कायद्याने गुन्हा आहे; परंतु आजही अनेकजण महामार्गावरील, तसेच शहरातील रस्त्याने दुचाकी, चारचाकी वाहन चालविताना मोबाईलवर संभाषण करताना दिसून येत आहेत. हा प्रकार त्यांच्या व इतरांसाठीही धोकादायक ठरणारा आहे. यावर आळा घालणे गरजेचे आहे.
राष्ट्रीय महामार्गावर दिशादर्शक नाही
कोरपना : राजुरा ते आदिलाबाद राष्ट्रीय महामार्गावरील खिर्डी ते राज्य सीमादरम्यानच्या मार्गावर दिशादर्शक व अंतर फलक नसल्याने वाहतूकदारांची गैरसोय होत आहे. हा महामार्ग जिल्ह्यातील अत्यंत वर्दळीचा महामार्गापैकी एक आहे.
आवळगाव ते कोसंबी रस्त्याची दुरवस्था
ब्रह्मपुरी : ब्रह्मपुरी तालुक्यातील आवळगाव ते कोसंबी रस्त्याची अत्यंत दैना अवस्था झाली आहे. हा रस्ता कित्येक वर्षांपासून कच्चा असून, या संपूर्ण रोडची गिट्टी उखडलेली असून, मोठ-मोठे खड्डे पडले आहेत.
पाण्याच्या टाक्या केवळ शोभेच्या
ब्रह्मपुरी : तालुक्यातील अनेक गावांत नळयोजनेंतर्गत लाखो रुपये खर्च करून पाण्याच्या टाक्या बांधण्यात आल्या. परंतु, या टाक्या शोभेच्या वास्तू ठरत आहे. काही तांत्रिक अडचणींमुळे अनेक गावांत नळयोजनेचे पाणी मिळत नाही. याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.