बाबराळा येथील प्रकार : महिलांचे आरोग्य सुधारण्याऐवजी बिघडण्याची शक्यता बळावलीमूल : गरोदर व स्तनदा मातांचे आरोग्य सुदृढ राहावे, यासाठी एकात्मिक बालसेवा योजनेअंतर्गत वाटप करण्यात आलेली पाककृती-१ व पाककृती-२ ची पाकिटे मुदतबाह्य असल्याचा प्रकार तालुक्यातील बाबराळा येथे उघडकीस आला. त्यामुळे महिलांचे आरोग्य सुधारण्याऐवजी बिघडण्याची शक्यता बळावली आहे. मूल तालुक्यातील बाबराळा येथील वर्षा किशोर ठाकुर यांनी पाकीट फोडल्यानंतर अळ्या निघाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे तालुक्यातील १५९ आंगणवाडी केंद्रातील वाटपात आलेले पाकिटे निकृष्ठ असल्याचा प्रकार दिसून येत आहे. जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागाच्या मार्फतीने तालुक्यातील एकात्मिक बाल विकास योजनेअंतर्गत गरोदर माता व स्तनदा माता यांना पाककृती-१ व पाककृती-२ चे पाकिटे वाटप करण्यात येतात. या पाककृती वाटपाचे कंत्राट चंद्रपूर येथील बचत गटाला देण्यात आले आहे. तालुक्यातील बाबराळा येथे अंगणवाडी केंद्रात १८ सप्टेंबरला पाककृती देण्यात आले. ते अंगणवाडी कार्यकर्त्यांना २१ सप्टेंबरला वाटप करण्यात आले. यात वर्षा किशोर ठाकुर या महिलेला पाकिटे दिल्यानंतर ती पाकिटे घरी गेल्यानंतर फोडली असता, त्यात अळ्या आढळून आल्या.पाकिटातील उत्पादनाची तारिख १२ जुलै २०१२ असून उत्पादनाच्या तारखेपासून चार महिन्यापर्यंत असे नमूद केले आहे. असे असताना सुद्धा बचत गटांनी ते अंगणवाडींना पुरविले. यावरुन बचत गटच जबाबदार असल्याचा आरोप करून याबाबतची तक्रार मूलच्या बाल प्रकल्प कार्यालयात करण्यात आली आहे. शासन महिलांचे आरोग्य सुधारावे यासाठी आटापिटा करून नवनविन योजना राबविते. मात्र ‘आंधळा दळतो आणि कुत्रा पिठ खातो’ या उक्तीप्रमाणे कारभार सुरू असल्याने योजनेचे वाटोळे होत असल्याचे दिसून येते. याकडे गांभीर्याने लक्ष देऊन दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी गीता पानसे व इतर १४ महिलांनी बाल प्रकल्प अधिकारी मूल यांच्याकडे केली आहे.शासन बालक व मातांच्या सुदृढ आरोग्यासाठी विविध योजना अंमलात आणून लाभ देत आहे. मात्र अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षतेमुळे पुरवठादार निकृष्ठदर्जाचे साहित्य पुरवून माता व बालकांचे आरोग्य बिघविण्याचे काम करीत आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अशा पुरवठाधारकांना कारवाई करून भविष्यात असे प्रकार घडणार नाही याची काळजी घेण्याची गरज आहे. या प्रकरणाच्या कारवाईकडे तालुकावासीयांचे लक्ष लागले आहे. (तालुका प्रतिनिधी)मुदतबाह्य दिलेली पाककृती-१ व पाककृती-२ ची पाकिटे ही गंभीरबाब असून याबाबत वरिष्ठांना कळविले जाईल. तसेच संबंधीत पाककृतीचा पुरवठा करणाऱ्या महिला बचत गट यांना जाब विचारले जाईल. गरोदर व स्तनदा मातांना योग्य पाककृती पुरवठा होईल, याकडे लक्ष दिले जाईल.- एस. जी. पुरीबाल प्रकल्प अधिकारी, मूलस्तनदा व गरोदर मातांना द्यायची पाककृती-१ व पाककृती-२ ची पाकिटे महिला बचत गटांने १८ सप्टेंबरला अंगणवाडी केंद्रावर वाहनाने पोहचता करून दिले. त्यानंतर ती पॉकीटे आपण स्तनदा व गरोदर मातांना २१ सप्टेंबरला वाटप केले.- अश्विनी नाहगमकरअंगणवाडी कार्यकर्ता, बाबराळा
गरोदर व स्तनदा मातांना पुरविलेली पाककृती मुदतबाह्य
By admin | Published: September 24, 2015 1:05 AM