चंद्रपूर : शिक्षण प्रसारक मंडळ मूलद्वारे मूल येथे नवभारत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाची चार मजलीच्या दोन इमारती आहेत. यामध्ये ५०० विद्यार्थ्यांची सोय होईल, एवढ्या वर्गखोल्या आहेत. महाविद्यालयाला तीन तुकड्यांना शिक्षण विभागाने मान्यता दिली दिली आहे. मात्र आजही ६५ टक्क्यांपासून ९२ टक्क्यांपर्यंतचे विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे ११ वी विज्ञानच्या चार अतिरिक्त वर्गांना मान्यता द्यावी, अशी मागणी संस्थाध्यक्ष ॲड. बाबासाहेब वासाडे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांसह शिक्षणमंत्र्यांना पत्र पाठविले आहे.
जिल्ह्यात मूल या शहराला राजकीय वारसा लाभलेला आहे. स्व. दादासाहेब कन्नमवार यांची कर्मभूमी आहे. त्यांनीच ग्रामीण भागाला शहराशी जोडण्याचे कार्य केले. शिक्षणाच्या माध्यमातून शिक्षण प्रसारक मंडळाची १९४० मध्ये स्थापना केली. नवभारत विद्यालयातील कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयातून दरवर्षी अनेक विद्यार्थी उच्च शिक्षणाकरिता नागपूर, पुणे शहरात जातात. आताच्या स्थितीत या महाविद्यालयात २५० विद्यार्थ्यांकरिता मान्यता असून, तीन तुकड्यांना शिक्षण विभागाची मान्यता आहे. मात्र आजही अनेक विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत असून, त्यांना विज्ञान विषयातून शिक्षणाची गरज असल्याचेही पत्रात म्हटले आहे. येथील विद्यार्थ्यांची संख्या बघता चार अतिरिक्त तुकड्यांना मंजुरी द्यावी, अशी मागणी संस्थाध्यक्ष ॲड. बाबासाहेब वासाडे यांनी केली आहे.