साईनाथ कुचनकार, चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात अनेक अतिरिक्त शिक्षक विभागस्तरावर इतर शाळांमध्ये तात्पुरत्या समायोजनाने काम करत आहेत. सन २०१९-२०पासून आश्रमशाळांचे संचनिर्धारण न करता तसेच जिल्ह्यात अनेक अतिरिक्त शिक्षक असताना चंद्रपूरच्या समाज कल्याण विभागाच्या सहायक आयुक्तांनी अनेक संस्थांना आश्रमशाळांमध्ये नवीन शिक्षकांची पदभरती करण्याकरिता जाहिरातीला परवानगी दिली आहे. यात गैरप्रकार झाला असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांनी केली आहे.
इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत संचलित अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळांतील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समस्या निवारणार्थ सहविचार सभा नागपूर प्रादेशिक उपसंचालक विजय साळवे व विभागातील सहाही जिल्ह्यांचे सहायक आयुक्त यांच्यासोबत पार पडली. यावेळी आमदार अडबाले यांनी अधिकाऱ्यांना सुनावले.
यावेळी आश्रमशाळांचे वेतन १ तारखेला अदा करावे, जिल्हानिहाय संचमान्यतेबाबत सद्यस्थिती, चालू सत्रात अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाची सद्यस्थिती, शिक्षकांना नवीन तीन लाभांची आश्वासित प्रगती योजना लागू करावी, मागील पाच वर्षांत ज्येष्ठता डावलून मुख्याध्यापक पदावर दिलेल्या नियमबाह्य पदोन्नत्या रद्द कराव्या, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अर्जित रजा तथा रोखीकरण लाभ मंजूर करावा, वसतिगृह विभाग कर्मचाऱ्यांना साप्ताहिक सुटी मंजूर करावी आदी समस्याही त्वरित सोडविण्यासंदर्भात अधिकाऱ्यांसोबत त्यांनी चर्चा केली. या प्रलंबित समस्या १५ दिवसात निकाली काढाव्यात व याच विषयांवर जूनच्या पहिल्या आठवड्यात परत बैठक घ्यावी, अशा सूचना आमदार सुधाकर अडबाले यांनी केल्या.