वरोरा तालुका : बाळू धानोरकर यांची जलसंपदा राज्यमंत्र्यांशी चर्चा वरोरा : तालुका ‘सुजलाम सुफलाम’ होण्यास वरदान ठरु पाहणारा लाल नाला व पोथरा कालवा अनेक ठिकाणी नादुरुस्त असल्याने शेतकऱ्यांना सिंचनाकरीता मुबलक पाणी मिळत नाही. या कॅनलच्या दुरुस्ता तातडीने करण्यात याव्या याकरीता निधी उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार बाळू धानोरकर यांनी जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्याकडे केली आहे.वरोरा तालुक्यातील १०० गावातील शेतकऱ्यांना लाल व पोथरा कालव्यापासून सिंचनाकरीता पाणी मिळते. लाल नाला प्रकल्पात ७२९० हेक्टर जमीन सिंचनाखाली येते. पोथरा कॅनलमध्ये ११ हजार ६३२ हेक्टर जमीन व लभान सराड धरणातून २ हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली येते. हे तिनही प्रकल्प जुने असल्याने अनेक ठिकाणी नादुरुस्त झाले आहे. त्यामुळे सिंचनाचा लाभ शेतकऱ्यांना मिळत नसल्याने या परिसरातील शेतकरी दुबार पीक घेतांना दरवर्षी अडचणीत सापडत असतात. शेतकऱ्यांचे आर्थिक स्त्रोत दिवसागणिक घटत आहे. त्यामुळे लाल नाला धरण दुरुस्ती करिता १ कोटी, कालवा दुरुस्ती करिता १० कोटी, पोथरा नाला धरण दुरुस्तीकरिता १ कोटी, कालवा दुरुस्ती करिता १८ कोटी, लभान सराड धरण दुरुस्तीकरिता ३० लक्ष व कालवे दुरुस्तीकरिता १ कोटी रुपये मिळावे, याकरीता आमदार बाळू धानोरकर यांची जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्यासोबत सकारात्मक चर्चा केली. सदर प्रकल्पांना अल्पावधीत निधी उपलब्ध होवून कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती आमदार बाळू धानोरकर यांनी दिली. काही दिवसात काम सुरू होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. (तालुका प्रतिनिधी)
लाल पोथरा कॅनल दुरुस्तीला निधी मिळणार
By admin | Published: July 18, 2015 12:57 AM