शहरापासून ते दुर्गम भागापर्यंत एस. टी. पोहोचली आहे. स्पर्धेच्या काळात प्रवाशांची आजही एस. टी.लाच अधिक पसंती आहे. मात्र, काही अडचणींचा प्रवाशांना आजही सामना करावा लागत आहे. विशेषत: आग लागल्यास त्वरित उपाययोजना म्हणून प्रत्येक एस. टी.मध्ये अग्निशमन यंत्र असणे गरजेचे आहे. यासाठी तशी तरतूदही करण्यात आली आहे. मात्र, बहुतांश बसमधील हे यंत्र गायब झाले आहे.त्यामुळे एखाद्यावेळी आग लागल्यास काय करणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे, काही नवीन बसमध्येही यंत्र नसल्यामुळे महामंडळाचा निष्काळजीपणा समोर आला आहे. त्यामुळे प्रवाशांच्या जिवाला धोका झाल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
या बसमध्ये नाही अग्निशमन यंत्र
चंद्रपूर - वणी
चंद्रपूर - मुकूटबन
राजुरा - अमरावती
--
बाॅक्स
प्रथमोपचार पेट्याही गायब
चंद्रपूर विभागअंतर्गत चंद्रपूर, राजुरा, वरोरा आणि चिमूर आगार येतात. यामध्ये शेकडो बस दररोज ये-जा करतात. मात्र, बहुतांश बसमधील प्रथमोपचार पेट्या गायब असल्याचे दिसून येत आहे.
बाॅक्स
वायफाय नावालाच
काही वर्षांपूर्वी महामंडळाने एस. टी.मध्ये वायफाय सेवा सुरू केली होती. काही आगारांमध्येही प्रवाशांसाठी ही सेवा उपलब्ध करून देण्यात आली होती. मात्र, सध्या एस. टी. तसेच आगारातील ही सेवा बंद पडली आहे. लाखो रुपये खर्च करूनही सुरु केलेल्या या सेवांतून महामंडळाचे मोठे नुकसान झाले आहे.
- देखभाल दुरुस्ती नावालाच
देखभाल दुरुस्तीसाठी एस. टी.ची स्वतंत्र यंत्रणा आहे. मात्र, लक्ष देऊन कामच केले जात नसल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नियमित स्वच्छता करणे गरजेचे असताना याकडेही दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे पाहिजे तशी स्वच्छता बसमध्ये बघायला मिळत नाही.
--
चंद्रपूर येथील बसस्थानकाचे आता नव्याने बांधकाम सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे तात्पुरत्या शेडमधून एस. टी.चा कारभार सुरू आहे. मात्र, स्वच्छतेकडे पाहिजे तसे लक्ष नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.