पालकांना मनस्ताप : संबंधित विभागाने लक्ष देण्याची मागणीनवरगाव : विविध राष्ट्रीय बँकांमध्ये शेतकऱ्यांना, विद्यार्थ्यांना शुन्य बचतीवर बँकेमध्ये खाते उघडता येतील, असे पंतप्रधानांनी सांगितल्यानंतरसुद्धा बँकाकडून एक-दोन हजार रुपये जमा केल्याशिवाय पासबुक मिळणार नाही, असे सांगितले जात आहे. यामुळे विद्यार्थी व पालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.भारतातील प्रत्येक नागरिक हा राष्ट्रीयकृत बँकेसोबत जुळला पाहिजे, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शून्य बचतीवर खाते उघडता येईल, असे सांगितले होते. काही बँकांनी याला प्रतीसाद देऊन खाते उघडून घेतले. मात्र हळूहळू काही बँकांनी झिरो बॅलन्स नाही तर एक-दोन हजार रुपये खात्यावर जमा केल्याशिवाय पासबूक देणेच बंद केले आहे.शेतकऱ्यांना, तसेच शालेय विद्यार्थ्यांनासुद्धा विविध शासकीय योजनांचा लाभ त्यांच्या खात्यावर शासनाकडून दिला जातो. त्यासाठी त्याला राष्ट्रीयकृत बँकांचे पासबूक आवश्यक आहे. विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशीप परीक्षा व इतर शैक्षणिक परीक्षा, उपस्थिती भत्ता अशा विविध योजनांसाठी आता विद्यार्थ्यांना खाते खोलणे बंधनकारक केले आहे. खाते खोलण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांना कायदपत्रांसह पायपीट करावी लागते. शिवाय वेळेवर कागदपत्राची जुळवाजुळव करण्यासाठी आर्थिक खर्च येतोच. यासाठी काही बँकेत एक- दोन दिवसातच पासबुक बनवून दिले जाते तर काही बँकांमध्ये पासबुक मिळण्यासाठी एक ते दीड महिन्यांचा कालावधी लागत आहे. एक- दिड महिना वाट पहिल्यावर पासबुक आणण्यासाठी जसे एसबीआय शाखा सिंदेवाही येथे गेल्यानंतर प्रथम एक ते दोन हजार रुपये खात्यावर जमा करा. त्यानंतरच पासबुक तुम्हाला मिळेल, असे तेथील कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे स्कॉलरशीप परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना तसेच इतरांनासुद्धा मनस्ताप सहन करावा लागत आहे.प्रत्येक व्यक्तीची आर्थिक परिस्थिती सारखीच नसून वेळेवर एक-दोन हजार रुपये खात्यात टाकणे शक्य होत नाही. त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली असती तर त्यांनी कधीच बँकामध्ये खाते खोलून आर्थिक व्यवहार केले असते. नुकतीच आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजनेचा निकाल लागला असून जे विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले, त्यांना राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक व इतर कागदपत्रे तर काही शाळांसाठी केवळ एसबीआय बँकेचे पासबुक काढणे बंधनकारक केले आहे. एक - दिड महिना पासबुक मिळण्यासाठी व पासबुक तयार झाल्यानंतर दोन हजार रुपये पालकांनी विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करावे, असा बँकेचा फतवा असल्याने अडचणी वाढलीे आहे. संबंधित विभागाने याकडे लक्ष देवून सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा देण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)
विद्यार्थ्यांना झिरो बॅलन्सवर पासबुक देण्यास नकार
By admin | Published: April 13, 2017 12:52 AM