भोजराज गोवर्धन ।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोना बाधिताची घरी राहण्याची व्यवस्था नसतानाही रुग्ण व त्याच्या कुटुंबाने कोरोना उपचार केंद्रात येण्यास नकार देवून घरीच राहण्याचा हट्ट धरला. अखेरीस तहसीलदारांनी हात जोडून विनंती केल्यानंतर प्रकरण निस्तरल्याचा प्रकार मूल तालुक्यातील मारोडा येथे उघडकीस आला.येथील एका राईस मिलमधील मजुराला कोरोनाची लागण झाली. त्याच्या संपर्कात मारोडा येथील दोन व्यक्ती आले. २८ सप्टेंबर रोजी आरटीपीसीआर तपासणीसाठी स्वॅब घेण्यात आले. दोघांचाही अहवाल पॉझिटिव्ह आला. हा अहवाल रात्री आल्याने आरोग्य विभाग, ग्रामपंचायत पथक, मारोड्याचे प्रशासक जीवन प्रधान, ग्रामविकास अधिकारी विलास भोयर, तलाठी संतोष पेंदोर आदींनी बाधिताच्या घरी जावून कोरोना उपचार केंद्रात जाण्याचे सुचविले. मात्र बाधिताची पत्नी व कुटुंबाने तेथे येवून माझे शेतीचे नुकसान करायचे आहे काय, आधी नुकसान भरपाई देतो म्हणुन लिहून द्या आणि तेव्हाच उपचारासाठी न्या, असा हट्ट धरला.
पथकाने रूग्णाच्या घरातील आवश्यक सोयीसुविधा तपासल्या. पण, त्याही उपलब्ध नव्हत्या. तरीही ते ऐकण्याच्या मनस्थिती नसल्याने कर्मचाऱ्यांनी तहसीलदार डी. जी. जाधव, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुमेध खोब्रागडे यांना मोबाईलद्वारे माहिती दिली. तहसीलदार जाधव, सहाय्यक गटविकास अधिकारी राजु परसावार, डॉ. खोब्रागडे आदींनी तात्काळ मारोडा गाठले. त्यांनीही कुटुंबाला समजावून सांगितले. मात्र, बाधिताच्या पत्नीने सहाही व्यक्तींना घेवून जा आणि शेती, जनावराचे तुम्हीच पाहा, असे सांगून नकार दिला. शेवटी तहसीलदाराने हात जोडतो, पाया पडतो. परंतु गावात संसर्ग वाढू देवू नका, अशी विनंती केली. त्यानंतर तयारी दर्शवल्याने पोलिसांच्या मदतीने बाधिताला मूल येथील उपचार केंद्रात दाखल केले.