आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीने राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा माजी मंत्री मधुकर पिचड यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने आदिवासींच्या समस्यांबाबत राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्याशी राजभवन येथे भेट घेवून चर्चा केली. यावेळी विदर्भ सचिव तथा आदिवासी सेवक केशव तिराणिक यांनी आदिवासींच्या विविध समस्यांचे निवेदन राज्यपाल यांना सादर केले.राज्यपालांशी झालेल्या चर्चात्मक बैठकी दरम्यान धनगर समाजाला आदिवासींमध्ये घेण्यात येऊ नये, ६ जून २०१७ च्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची कडक अमंलबजावणी करावी, कोणत्याही एकाच कुटुंबातील व्यक्तीकडे जात वैधता उपलब्ध असलेल्या प्रमाणपत्राचा पुरावा समजून कुटुंबातील अन्य व्यक्तींना जात वैधता प्रमाणपत्र देण्याचा निर्णय रद्द करावा, आदिवासींच्या जमिनी गैरआदिवासींनी हडप करुन नये म्हणून जमिनीचा कायदा कठोर करावा, अशी मागणी करण्यात आली.या शिष्टमंडळात माजी आ. आंनदराव गेडाम, केशव तिराणिक, नामदेव किरसान, लक्की जाधव, निवृत्ती घोडे, कृष्णराव परतेकी, दिनेश शेराम, अशोक आत्राम, दादाराव तारपे, दिनेश पटेकर, राम चव्हाण, मंगलदास भवारी, विजय खूपसे, सुहास नाईक, भारत घाणे आदींचा समावेश होता. आदिवासी समाजाच्या मागण्यांचा सहानभुतीपुर्वक विचार करण्याची मागणी करण्यात आली आहे.
आदिवासींच्या समस्यांबाबत राज्यपालांना साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 11:06 PM