मूल : तालुक्यातील टेकाडी येथील स.न. २१५, २१६ व २१७ या जमिनीच्या इ पंजी अतिक्रमण रजिस्टरमध्ये असलेले नाव व्हाईटनरने खोडतोड करून इतरांना लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न महिला तलाठी ठाकूर करीत असल्याची तक्रार विमल दशरथ जकुलवार या महिला शेतकऱ्याने तहसीलदारांकडे केली आहे. मूल तालुक्यातील तलाठी साजा क्रमांक चारमधील चिमढा येथे महिला तलाठी ठाकूर कार्यरत आहेत. टेकाडी हे गाव त्यांचा साजामध्ये येते. टेकाडी येथील स.न. २१५, २१६, २१७ मधील जमिनीवर सन १९५३-५४ नोंदीप्रमाणे अतिक्रमण रजिस्टरवर नोंद घेतलेली आहे. त्यात विमल दशरथ जकुलवार हे नाव नोंद आहे. असे असताना इतरांना लाभ देता यावा, यासाठी तलाठी ठाकूर यांनी पांढऱ्या शाईने रेकॉर्डवर खोडतोड करुन नाव कमी करण्याचा प्रयत्न केला. तलाठी ठाकूर या महिला असतानासुद्धा राजकारण करुन लोकांमध्ये द्वेष भावना निर्माण करीत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या शेतजमिनीला लागून स.न. २१९ ही क्रिष्णा उर्फ किसन जराते यांची शेतजमिन आहे. मात्र इतरांना फायदा घेता यावा व त्यात आपणाससुद्धा काही मिळावे. या उद्देशाने माझ्या वहीवाटीतील शेतजमिन बळकावण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप विमल जकुलवार यांनी केला आहे. याबाबत चौकशी करून खोडतोड केलेला रेकॉर्ड पूर्वीप्रमाणे करण्यासाठी आदेश करावा व न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)
तलाठ्याने अतिक्रमण रजिस्टरमध्ये केली खोडतोड
By admin | Published: August 21, 2014 11:48 PM