चंद्रपूर : व्यावसायिक अभ्यासक्रमातून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठ्या प्रमाणात कौशल्यप्राप्त मनुष्यबळ उपलब्ध होत आहे. काळानुरूप या क्षेत्रात आता दर्जेदार संशोधनाची गरज आहे. विद्यार्थ्यांनी नियमित वर्गाला उपस्थित राहले, तर यातून परीक्षेत हमखास यश तर मिळेलच मात्र प्रतिभावान विद्यार्थ्यांची पिढी देखील तयार होईल, असे प्रतिपादन गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीचे कुलगुरू डॉ. एन.व्ही. कल्याणकर यांनी केले आहे. सर्वोदय शिक्षण मंडळ संचालित लिना किशोर मामीडवार इंस्टिटयुट आॅफ मॅनेजमेंट स्टडीज अॅन्ड रिसर्च येथे गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीद्वारा उन्हाळी २०१६ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत विद्यापीठातून मेरीट आलेल्या विद्यार्थ्यांचे सत्कार समारंभाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री तथा सर्वोदय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शांताराम पोटदुखे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून सर्वोदय शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष सी.ए. रमेशपंत मामीडवार, सचिव प्रशांत पोटदुखे, पालक प्रतिनिधी संजय कपूर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे.एन. चक्रवर्ती यांची उपस्थिती होती.गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन.व्ही. कल्याणकर यांचे हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे वतीने कुलगुरू डॉ. एन.व्ही. कल्याणकर यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. (नगर प्रतिनिधी)
यश प्राप्तीसाठी वर्गाला नियमित उपस्थित राहवे -कल्याणकर
By admin | Published: January 21, 2017 12:46 AM