पाणीपुरवठ्यासंदर्भात नागरिकांना होणारा त्रास खपवून घेतला जाणार नाही, असेही आ. सुधीर मुनगंटीवार म्हणाले. ९ जानेवारीपासून बल्लारपूर शहरातील पाणीपुरवठा नियमित सुरू होईल, असे आश्वासन मजिप्राचे कार्यकारी अभियंता झळके यांनी दिले.
बल्लारपूर शहरात गेल्या काही दिवसांपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याच्या तक्रारी काही नागरिकांनी आ. मुनगंटीवार यांच्याकडे केल्या असता त्यांनी त्वरित आज बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरीश शर्मा, मुख्याधिकारी सरनाईक, मजिप्राचे अधीक्षक अभियंता गव्हाणकर, कार्यकारी अभियंता झळके, घोडमारे यांच्यासमवेत बैठक घेतली. नदीवरील दोन पंप नादुरुस्त असल्यामुळे पाणीपुरवठा अनियमित होत असल्याचे मजिप्राच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. हे पंप दुरुस्त करण्याची कार्यवाही येत्या दोन दिवसात पूर्ण करून ९ जानेवारीपासून पाणीपुरवठा करण्यात येईल, असे झळके यांनी यावेळी सांगितले.
उन्हाळ्याचे दिवस नसताना अशा पद्धतीने नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणे, ही बाब गंभीर असल्याचे सांगत आ. मुनगंटीवार यांनी पाणीपुरवठ्याच्या प्रक्रियेतील सर्व दोष दूर करून नियमित पाणीपुरवठा करण्याबाठ्चे निर्देश संबंधितांना दिले. याबाबत नगराध्यक्ष हरीश शर्मा यांनी ५ जानेवारी रोजी बैठक घेऊन आढावा घ्यावा, अशी सूचना त्यांनी यावेळी केली. या प्रक्रियेत संसाधन, निधी याबाबत काही अडचण असल्यास सविस्तर माहिती देण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. त्याअनुषंगाने पाणीपुरवठा मंत्र्यांसह बैठक घेऊन आपण योग्य तोडगा काढू, असेही आ. मुनगंटीवार यावेळी बोलताना म्हणाले.