लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : वेकोलिच्या मुंगोली खुल्या कोळसा खाणी व निगुर्डा डीप कोळसा खाणीच्या विस्तारीकरणामुळे मुंगोली गावात विविध समस्या निर्माण झाल्या. मुंगोली गावाचे पुनर्वसनासाठी मागील एक दशकापासून नागरिकाच्या संघषार्नंतर वेकोलिने गावाच्या पुनर्वसनाकरिता ६० कोटींची तरतूद करून ५.१८ हेक्टर भूसंपादन केली. संपादित भूखंडाचा मोबदला देऊन मुंगोली गाव पुनर्वसन क्षेत्राचा दोन दिवसांपूर्वी फलकही लावला.वेकोलिचा २५ वर्षांपूवीर्चा मुंगोली कोळसा खाण हा मोठा प्राजेक्ट होता. त्यासाठी मुंगोली व आजूबाजूच्या साखरा, कोलगाव, शिवणी शिवारातील शेतजमिनी वेकोलिने संपादित केल्या. मात्र जसजसा कोळसा खाणीचा विस्तार झाला, तसतशा जमिनी संपादित केल्या. त्यानंतर निगुर्डा डीप कोळसा खाण सुरू झाली. कोळसा खाणीमुळे त्या परिसरातील उर्वरित शेतजमिनी सोडून दिल्या. त्यामुळे शेतमालाचे उत्पादन पुरेशे होत नव्हते. कोळसा खाणीच्या ब्लास्टिंगमुळे घरावर दगड पडणे, प्रदूषण, पाणी टंचाई, गावात आजार पसरणे, विशेषत: कोळसा खाणीचे ओव्हर बर्डन (मातीचे ढिगारे) वर्धा नदी किनाऱ्यावर टाकल्याने नदीच्या पुराचा धोका निर्माण झाला आहे. अशा विविध समस्या निर्माण झाल्याने सातशे लोकसंख्या असलेल्या मुंगोली गावाचे पुनर्वसन व्हावे व गाव परिसरातील शेतजमिनी संपादित करण्याची मागणी करण्यात आली.
जिल्हा प्रशासन, लोकप्रतिनिधी, वेकोलि यांच्या वेळोवेळी संयुक्त बैठका झाल्या आणि सुटलेल्या शेतजमिनी वेकोलिने संपादित केल्या. सदर कोळसा खाणीसाठी ३२८ हेक्टर शेतजमिनी संपादित केल्या. शेत जमिनीचा प्रश्न सुटला असला तरी मुंगोली गावच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेंगाळत राहिला. तत्कालीन सरपंच रुपेश ठाकरे व त्यांचे सहकारी यांनी गावच्या पुनर्वसनाचा प्रश्न उचलून धरला. वेळोवेळी वेकोलिच्या अधिकाऱ्यांच्या भेटी, चर्चेच्या माध्यमातून तर कधी आंदोलने करून कायद्याच्या मागार्ने पुनर्वसनाची मागणी रेटून धरली. अखेर पुनर्वसनासाठी जागा निश्चित झाली. तसा प्रस्ताव ग्रामपंचायतीच्या माध्यमातून वेकोलिला सादर केला.असा आहे प्रस्तावमुंगोली गावापासून सुमारे १५ किमी अंतरावर ग्रामस्थांनी निश्चित केलेल्या भूसंपादनाची प्रक्रिया व गावाच्या पुनर्वसनासाठी वेकोलिने ५९.७७ कोटींचा प्रस्ताव मंजूर केला.आणि पुनर्वसनाकरिता ५.१८ हेक्टर भूमी संपादनाची प्रक्रिया सुरू केली. २७ ऑगस्टला जमिनीच्या विक्री व सप्टेंबर महिन्यात संपादित भूमीचा मोबदला दिला व बुधवारी पुनर्वसन जागेवर फलक लावला. तब्बल एका दशकानंतर मुंगोली गावाच्या पुनर्वसनाचे स्वप्न पूर्ण झाले. पुनर्वसनानंतर तालुक्याचे अंतर कमी होणार असून प्रदूषणरहित गाव गावकऱ्यांना मिळणार आहे.