राजू गेडाम
मूल : मृत्यू पावलेल्या महिलेचे प्रेत अंत्यसंस्काराला नेण्यासाठी नातेवाइकांनीच रस्ता रोखून धरल्याने समाजबांधव संतापले आणि शेवटी पोलिसांना पाचारण करून त्यांच्या बंदोबस्तात प्रेत उचलावे लागल्याची घटना मंगळवारी दि. ६ शहरातील वाॅर्ड क्रमांक १६ मध्ये घडली.
मूल येथील विहीरगाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व बौद्ध समाज असलेल्या या वाॅर्डात वनिता नारायण खोब्रागडे (४५) या महिलेचा रविवारी मृत्यू झाला. महिलेच्या घरी कुणीच नसल्याने ही बाब निदर्शनास आली नाही. दोन दिवसांनी दुर्गंधी पसरू लागल्याने चर्चा सुरू झाली. नातेवाइकांना याबाबत कळविण्यात आले. घराची पाहणी केली असता वनिता खोब्रागडे हिचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले. मंगळवारी नातेवाईक व समाजबांधवांनी अंत्यसंस्काराची तयारी केली. तयारी पूर्ण झाल्यानंतर प्रेत उचलल्यानंतर मृताचे नातेवाईक असलेल्या अनसूया पत्रुजी खोब्रागडे व अन्य नातेवाइकांनी त्यांच्या रस्त्यावरून प्रेत नेऊ देणार नाही, असा इशारा दिला. त्यातून वाद विकोपाला गेला.
समाजबांधवांनी समजूत घालूनही अनसूया खोब्रागडे व इतरांची मानसिकता बदलली नाही. त्यांचा विरोध कायम होता. याबाबत नगर परिषद व तहसील कार्यालयातून काही अधिकाऱ्यांना बोलावण्यात आले. त्यांनाही समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रतिसाद दिला नाही. अखेर पोलिसांना पाचारण करावे लागले. सहायक पोलिस निरीक्षक सतीश बन्सोड यांना याबाबत माहिती दिली असता ते पथकासह घटनास्थळावर दाखल झाले. त्यांच्या नेतृत्वात पोलिस पथकाच्या मदतीने प्रेत नेण्याचा रस्ता मोकळा केला. त्यानंतर विलंबाने अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिस बंदोबस्तात प्रेत उचलण्याची मूल तालुक्याची पाहिलीच घटना असल्याचे बोलले जात आहे.