येथील पठाणपुरा वाॅर्डातील अनिता आणि रमेश रागीट यांचे ज्येष्ठ पुत्र वेकोलीमध्ये कार्यरत स्वप्निलचा विवाह नागपूर जिल्ह्यातील भिष्णूर येथील नंदिनी नासरे हिच्यासोबत १३ जुलै रोजी आयोजित करण्यात आला आहे. यासाठी रागीट कुटुंबीयांनी पत्रिका छापल्या असून त्या वितरितही केल्या आहेत.
लग्न म्हटल्यानंतर पत्रिका छापून त्या नातेवाईक, मित्रांना दिल्या जातात, त्यात खूप मोठे नवल नसते. मात्र रागीट कुटुंबीयांनी पत्रिकेच्या माध्यमातून मित्रपरिवारांसोबत पर्यावरणासोबतही नाते जपले आहे. पत्रिकेच्या अगदी समोरील बाजूला वृक्ष लावण्यासंदर्भात कळकळीचे आवाहन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, पत्रिकेत काही झाडांची नावे देण्यात आली असून, यातील जे झाड हवे असल्यास एक संपर्क क्रमांक दिला आहे. एसएमएसद्वारे वृक्षांची मागणी करण्याची विनंतीही करण्यात आली आहे; तर दुसऱ्या बाजूने पाणी वाचविण्याचा सल्ला देण्यात आला असून रेन वाॅटर हार्वेस्टिंग करण्याची विनंती करण्यात आली आहे.
बाॅक्स
आवडीचे वृक्ष मिळणार भेट
विवाहानिमित्त रागीट कुटुंबीयांनी एक अनोखी योजना आखली आहे. पर्यावरणविषयक जनजागृतीसोबत त्यांनी लग्नपत्रिकेत एक मोबाईल नंबर दिला आहे. पत्रिकेमध्ये विविध वृक्षांची नावे तसेच त्यासमोर एक क्रमांक दिला आहे. आवडीच्या झाडाचा क्रमांक एसएमएसच्या माध्यमातून पाठविल्यास ते झाड भेट देणार आहे. याशिवाय लग्नसमारंभाच्या वेळी रेन वाॅटर हार्वेस्टिंगबाबतही मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
कोट
पर्यावरणाचे संवर्धन करणे काळाची गरज आहे. मला याविषयी आवड असून इको-प्रो संस्थेसोबत काम करीत आहोत. त्यामुळे वृक्षलागवड तसेच रेन वाॅटर हार्वेस्टिंगबाबत जनजागृती करण्याचा विचार मनात आला. त्यानुसार लग्नपत्रिकेत जनजागृतीपर संदेश दिला आहे.
- स्वप्निल रागीट, चंद्रपूर