भद्रावती : कृषी व जलसंधारण विभागाच्यावतीने भद्रावती येथे आयोजित साखळी सिमेंट नाला लोकार्पण करण्यात आले.यावेळी पालकमंत्री संजय देवतळे, जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. डॉ. वनिता गोतमारे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे व उपविभागीय कृषी अधिकारी शिवचरण राजवाडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.पालकमंत्री संजय देतवळे व जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांच्या हस्ते भद्रावती तालुक्यातील पिपरी येथील साखळी सिमेंट नाल्याचे जलपूजन करून लोकार्पण करण्यात आले. यासोबतच जिल्ह्यातील १० तालुक्यातील ४१ गावात बांधण्यात आलेल्या १२६ साखळी सिमेंट नाल्याचे वेगवेगळ्या कार्यक्रमात लोकार्पण करण्यात आले.कृषी व जलसंधारण विभागाच्या वतीने सिंचन क्षेत्रात वाढ करणे, पाणी पातळी वाढविणे, भूगर्भातील पाण्याची पातळी वाढविणे, जमिनीची धूप थांबविणे, पिकांना संरक्षित पाणी देणे, जमिनीवर पडणारे पाणी जास्तीत जास्त जमिनीत मुरविणे आदी उद्देशाने बांधण्यात आलेल्या सिमेंट नाला लोकार्पणाचा कार्यक्रम घेण्यात आला.साखळी सिमेंट नाल्यासोबतच शेतकऱ्यांनी शेततळे मोठ्या प्रमाणात निर्माण करावे व त्यातून उत्पादकता कशी वाढेल, यावर भर द्यावा, असे देवतळे यांनी सांगितले. शासनाच्या पिक विमा योजनेस व कृषी संजीवनी योजनेस ३१ आॅगस्टपर्यंत मुदत वाढ देण्यात आली असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले.कमी पावसाच्या परिस्थितीत साखळी सिमेंट नाला व शेततळे सिंचनासाठी पुरक ठरतात, असे मत जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी व्यक्त केले. पाण्याचे महत्त्व ओळखून जास्तीत जास्त प्रमाणात पाणी अडवा व पाणी जिरवा, असा सल्ला त्यांनी शेतकऱ्यांना दिला. कृषी विभागाने अतिशय उपयोगी योजना सुरू केली असून शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात या योजनेत सहभागी होऊन लाभ घ्यावा, असे त्यांनी सांगितले. केंद्रीय कापूस संशोधन केंद्राच्या प्रधान शास्त्रज्ञ डॉ. वनिता गोतमारे व उपविभागीय कृषी अधिकारी शिवचरण राजवाडे यांची यावेळी भाषणे झाली. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी प्रास्ताविक केले.या कार्यक्रमास शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
१२६ साखळी सिमेंट नाल्यांचे लोकार्पण
By admin | Published: August 19, 2014 11:38 PM