चिखलगाव फाट्यावरील घटना : फरार आरोपींचा शोध सुरू
तळोधी बा. : आयसर ट्रकमधून कत्तलीसाठी नेणाºया १६ जनावरांची पोलिसांनी सुटका केली. ही घटना सोमवारी चिखलगाव फाट्याजवळ घडली. आरोपी फरार झाल्याने तळोधी पोलीस कसून शोध घेत आहेत.
एमएच ३४ बीजी ८१८३ क्रमाकांच्या ट्रकमधून जनावरे कोंबून नेत असल्याची माहिती तळोधी पोलिसांना मिळाली होती. चिखलगाव फाट्यावर नाकाबंदी करून ट्रकला अडविले असता ताडपत्री झाकून १६ जनावरे कोंबून कत्तलीसाठी नेत असल्याचे आढळले. दरम्यान, ट्रक अडविले असता आरोपी फरार झाले. ताब्यात घेतलेली जनावरे गोंविदपूर येथील गोरक्षण शाळेत ठेवण्यात आली आहेत. ही कारवाई ठाणेदार रविंद्र खैरकर यांच्या मार्गदर्शनात सतीश नेवारे, हंसराज सिडाम, मोरेश्वर शिंदे, सुरेश आत्राम आदींनी केली.