मूल : पावसाने गेल्या १५ दिवसांपासून डोळे वटारल्याने धान रोवणीसाठी शेतीमध्ये पाहिजे त्या प्रमाणात पाणी नाही. त्यामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आवश्यक असलेले पाणी आसोलामेंढा जलाशयामधून सोडावे, अशी मागणी मूल तालुक्यातील शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
हवामान खात्याने यावर्षी मुबलक प्रमाणात पाऊस येईल, असा अंदाज वर्तविला होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतीत धानाची पेरणी केली. मात्र आजघडीला पाऊस नसल्याने तालुक्यातील भवराळा, राजगड, चांदापूर, जुनासुर्ला, गडीसुर्ला, फिस्कुटी, विरई आदी शेतकरी हवालदील झाले आहेत. अनेक गावांतील शेकडो हेक्टर शेती आसोलामेंढा जलाशयाच्या पाण्यावर अवलंबून आहे. शेतीच्या चालू हंगामात प्रारंभी चांगला वा समाधानकारक पाऊस झाला. त्यामुळे परिसरातील बहुतांश शेतकऱ्यांनी धान रोवणी करणे सोयीचे व्हावे म्हणून धान पऱ्हे पेरणी केली. पेरणी केलेले धान रोवणीच्या दृष्टीने तयार होत असताना पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. धान रोवणीच्या दृष्टीने पाहिजे त्या प्रमाणात पाऊस येत नसल्याने पेरणी केलेले धानाचे पऱ्हे सुकायला लागली आहेत. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट कोसळून शेतीचा हंगाम लांबणीवर जाऊ शकतो, असे झाल्यास दुबार पेरणी करीता शेतकऱ्यांकडे बियाणे उपलब्ध नाही. दुबार पेरणीकरिता पुन्हा बाजारामधून बियाणे खरेदी करणे भाग पडेल आणि सध्याच्या कोरोना महामारीच्या आर्थिक संकट काळात बियाणे खरेदी करणे शेतकऱ्यांना परवडणारे नाही. ही वास्तविकता लक्षात घेऊन संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी तातडीने आसोलामेंढा जलाशयाचे पाणी सोडण्यात यावे, अशी मागणीचे निवेदन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांच्या मार्गदर्शनात काँग्रेस तालुकाध्यक्ष घनश्याम येनूरकर, बाजार समिती उपसभापती संदीप कारमवार, शांताराम कामडे संचालक, गौरव पुपरेड्डीवार, प्रदीप कामडे, अनिल निकेसर, गणेश खोब्रागडे, तयूब खाॅ पठान, तुळशिराम मोहुर्ल, रूमदेव गोहणे, लोकनाथ नरमलवार आदी शेतकऱ्यांनी आसोलामेंढा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांना भेटून निवेदन देण्यात आले.