जिल्हा परिषदेच्या निधीची उधळपट्टी : सतीश वारजूकर यांचा आरोपचंद्रपूर : जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून आठ दिवसांपूर्वी निवड झालेले देवराव भोंगळे यांच्या कक्षाचे विनानिविदा नूतनीकरण केले जात आहे. सदर प्रकार म्हणजे जिल्हा परिषदेच्या निधीची प्रशासनाकडून वाट लावली जात आहे. याबाबत जिल्हा परिषदेतील कोणताही अधिकारी बोलण्यासाठी तयार नसून या कामावर लाखो रुपयाची उधळपट्टी केली जात असल्याचा आरोप जिल्हा परिषदेचे विरोधी गटनेते डॉ. सतीश वारजूकर यांनी केला आहे.केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार आहे. जिल्हा परिषदेतही भाजपची सत्ता आली आहे. या पक्षाच्या नेत्याकडून नेहमी पारदर्शकतेचे पोवाडे गायीले जातात. कोणतेही काम नियमानुसारच केले जात असल्याचे या पक्षाचे पदाधिकारी बेडकपणे सांगत असतात. मात्र जिल्हा परिषदेमध्ये पारदर्शकतेच्या मुद्याला बगल देत जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी स्वत:च्या कक्षाचे नुतनीकरण करण्याचा सपाटा सुरू केला आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून देवराव भोंगळे यांची निवड २१ मार्चला झाली. त्यानंतर अवघ्या दोन दिवसातच म्हणजे २३ मार्चला आपल्या कक्षाच्या नुतनीकरणाचे काम सुरू केले. दोन दिवसातच या कामासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने कोणती निविदा काढली. हे कुणालाही ठाऊक नाही. या कामावर लाखो रुपयांचा खर्च केला जाणार असून हा पैसा जिल्ह्यातील नागरिकांचा आहे. तोच पैसा जिल्हा परिषदेचे नवनियुक्त अध्यक्ष सत्तेच्या जोरावर पाण्यासारखा खर्च करायला लागले आहेत. जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी कक्षाच्या नुतनीकरणाच्या माध्यमातून सत्तेवर येताच पारदर्शकतेला वेशिवर टांगून काम करण्याचा सपाटा सुरू केला आहे. हे काम म्हणजे त्यांचेच उदाहरण आहे. या कामासाठी जि.प. अध्यक्षांनी काही अधिकाऱ्यांना तोंडी आदेश देऊन काम करण्यास भाग पाडले आहे. त्यामुळे अध्यक्ष विराजमान होताच लाखो रुपयांचा चुराडा होणार आहे. या कामासंदर्भात भविष्यात विरोधी पक्षाकडून जाब विचारला जाईल, असे सतीश वारजूकर यांनी म्हटले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)जिल्हा परिषदेच्या इतर कामांमध्ये पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांकडून नियमाकडे बोट दाखविले जाते. कोणतेही काम निविदेशिवाय होणार नाही, अशी अट घातली जाते. सर्वसामान्य लाभार्थ्यांनाही लाभ देण्यासाठी नियमाचा पाढा वाचला जातो. मग, जिल्हा परिषद अध्यक्षांच्या कक्षावर लाखो रुपये खर्च होत असताना यासाठी ई-निविदा का काढण्यात आली नाही. - डॉ. सतीश वारजूकर, विरोधी पक्ष गटनेते जि. प. चंद्रपूर.शासनाने प्रत्येक पदाधिकाऱ्याला अधिकाराप्रमाणे खर्चाच्या काही मर्यादा दिल्या आहेत. त्या मर्यादेनुसारच माझ्या कक्षाचे नुतनीकरण सुरू आहे. नुतनीकरणाचे हे काम तीन लाखांच्या आत असल्याने कामाची ई-निविदा काढण्याची कोणतीही गरज नाही. विरोधकांचे आरोप बिनबुडाचे आहेत. - देवराव भोंगळेजिल्हा परिषद अध्यक्ष, चंद्रपूर.
जिल्हा परिषद अध्यक्षांच्या कक्षाचे विनानिविदा नूतनीकरण
By admin | Published: March 28, 2017 12:25 AM