महानगरातील नव्या वस्त्या रस्त्यापासून वंचित
चंद्रपूर : शहराचा दिवसेंदिवस झपाट्याने विस्तार होत आहे. मात्र शहरातील अनेक नवीन वस्त्या आजही अनेक सोयी सुविधांपासून वंचित आहे. यात प्रामुख्याने रस्त्याची समस्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे या भागात रस्त्यांची निर्मिती करण्यात यावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.
जलशुद्धीकरण केंद्राजवळ बागेची निर्मिती करा
चंद्रपूर : शहरातील तुकुम परिसरातील जल शुद्धीकरण केंद्राजवळ विस्तीर्ण जागा आहे. या जागेवर आबालवृद्ध, लहान मुले यांना विरंगुळ्यासाठी बागेची निर्मिती करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनकडून होत आहे.
तुटलेले साईन बोर्ड दुरुस्त करा
चंद्रपूर : शहरातील मुख्य मार्गावर बऱ्याच ठिकाणी शहरातील स्थानाबाबत साईन बोर्ड लावण्यात आले आहे. मात्र ते अनेक ठिकाणी तुटले आहेत. त्याची त्वरीत दुरुस्ती करावी, तसेच फलकावर बल्लारशा ऐवजी बल्लारपूर असे अंकित करावे, अशी मागणी होत आहे.
सुसज्ज रेल्वे स्थानके बांधण्यात यावी
चंद्रपूर : जिल्ह्यातील सिंदेवाही, ब्रह्मपुरी येथे इंग्रजकाळापासून रेल्वे स्थानक आहे. मात्र काळानुरूप या रेल्वेस्थानकाचे रूपडे अध्यापही पालटले नाही. त्यामुळे जुन्याच इमारतीतून येथील कामकाज सुरू आहे. या परिसरातील कर्मचारी सदनिका जीर्ण झाल्या आहेत. यामुळे त्याची सुधारणा करून सुसज्ज बनवण्यात याव्या, अशी मागणी होत आहे.
गवराळा-घुग्घुस मार्ग दुपदरी करावा
भद्रावती : तालुक्यातील गवराळा ते घुग्घुसमार्गे पिंपरी देशमुख हा मार्ग दुपदरीकरण करण्यात यावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे. या मार्गावर अत्यंत वर्दळ राहत असल्याने हा मार्ग अपुरा पडत आहे. त्यामुळे याचे दुपदरीकरण करण्यात यावे, अशी मागणी होत आहे.
बल्लारपूर-सिरोंचा रेल्वे मार्ग तयार करा
बल्लारपूर : येथून सिरोंचापर्यंत रेल्वे मार्ग तयार करण्यात यावा, अशी मागणी चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांकडून होत आहे. हा मार्ग तयार झाल्यास बल्लारपूर, गोंडपिपरी, आष्टी, आलापल्ली, अहेरी, सिरोंचा भागातील नागरिकांना जाण्या-येण्यासाठी सोयीचे होईल.