चंद्रपूर : रामाळा तलावाच्या संरक्षणार्थ बंडू धोतरे यांनी सुरू केलेल्या अन्नत्याग सत्याग्रहाला पाठिंबा देण्यासाठी रविवारी सातव्या दिवशी पुणे येथे निदर्शने करण्यात आली. चंद्रपुरातील रामाळाप्रमाणेच इतर शहरातील तलाव, नदी अंतिम घटका मोजत आहेत. रामाळा बचाव आंदोलनाचे उदाहरण डोळ्यासमोर आंदोलनाला पाठिंबा देतानाच, आपल्या शहरातील तलाव संवर्धनासाठी नागपूर, जळगाव, अमरावती येथेही निदर्शने करण्यात येणार आहेत.
आजच्या साखळी उपोषणात नितीन रामटेके, प्रमोद मलिक, कपिल चौधरी, संजय सब्बलवार, मनीषा जयस्वाल, प्रगती मार्कंडावार, पूजा गहुकर यांनी सहभाग घेतला. गोंडवाना विद्यापीठ तथा कवी कालिदास संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू श्रीनिवास वरखेडी यांनी अन्नत्याग सत्याग्रहाला भेट दिली. माजी आमदार ॲड.वामनराव चटप यांनीही भेट घेतली. रामाला तलावातील जलप्रदूषण आणि इको प्रोने केलेल्या मागण्यासंदर्भात बंडू धोतरे यांच्याशी चर्चा केली. यावेळी पर्यावरणप्रेमी प्रा.डॉ. योगेश दूधपचारे यांची उपस्थिती होती. चंद्रपुरातील रामाळा तलाव संवर्धनासाठी मागील सात दिवसांपासून सुरू असलेल्या अन्नत्याग सत्याग्रहाला पाठिंबा देण्यासाठी वसुंधरा अभियान बाणेर (पुणे)च्या वतीने रविवारी सकाळी घोषणाबाजी करण्यात आली. रामाळासह महाराष्ट्रातील सर्व नदी आणि तलावांचे इकोसीस्टम पद्धतीने संवर्धन व्हावे, यासाठी वसुंधरा अभियान आग्रही असून, पाठपुरावा करणार असल्याचे संस्थेचे पांडुरंग भुजबळ यांनी सांगितले.