ब्रह्मपुरी : देलनवाडी प्रभागातील शिक्षक कॉलनी, शाहू महाराजनगर येथील गेल्या १० ते १५ वर्षांपासून प्रलंबित रस्त्यांच्या मागणीसाठी येथील महिलांनी नगराध्यक्षा रिता उराडे यांना निवेदन दिले.ब्रह्मपुरी शहर देलनवाडी, आरमोरी रोड व वडसा रोड आदी भागात मोठ्या प्रमाणात विस्तारले गेले आहे. परंतु त्या तुलनेत रस्त्यांचा, नाल्यांचा अभाव वर्षानुवर्षे रखडलेले आहे. देलनवाडी प्रभागात ब्रह्मपुरीच्या तुलनेत नविन वसाहती मोठ्या प्रमाणात निर्माण झाल्या आहेत. नगरपालिकेला सर्वाधिक कामे याच प्रभागामध्ये घेण्याची खरी गरज आहे. परंतु या प्रभागाकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांत प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. काही ठिकाणी १५ वर्षांपासून वास्तव्यास असूनही जाण्यासाठी धड रस्ता नाही, सांडपाणी वाहून नेण्यासाठी नाली नाही. नगरसेवक जुन्या रस्त्यांना प्राधान्य न देता नविन रस्त्याचे डांबरीकरण करण्यात पालिका धन्यता मानत आहे. शाहू महाराजनगर व शिक्षक कॉलनी परिसरातील महिलांनी आपल्यावर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात व नगरसेवकाच्या मनमानी कारभाराला आवर घालण्याच्या मागणीसाठी नगराध्यक्षांना निवेदन देऊन आपबिती सांगितली. यावर काहीच तोडगा काढला नाही तर न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा इशारा देण्यात आला आहे. निवेदन देताना भैसारे, रगडे, पिसे, संतोष मेश्राम अन्य महिला व पुरुष यावेळी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
रस्त्याच्या मागणीसाठी नगराध्यक्षांना निवेदन
By admin | Published: February 22, 2016 1:19 AM