चंद्रपूर : गोंडवाना विद्यापीठ व्यवस्थापन परिषद व विद्या परिषदेच्या स्थापनेबाबत जो गोंधळ झाला आहे, त्या संदर्भात डॉ. बाबासाहेब आंबेडकर गोंडवाना युनिव्हरसिटी टिचर्स असोसिएशनच्यावतीने स्थानिक विश्रामगृहावर आमदार विजय वडेट्टीवार यांना निवेदन देण्यात आले. सोबतच या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली.विद्याशाखेत अधिष्ठाता पदासाठी नामनिर्देशित झालेले प्राध्यापक नेट-सेट ग्रस्त आहेत. ज्या व्यक्तींच्या महाविद्यालयाच्या दोनशे विद्यार्थ्यांच्या प्रवेशाच्या आणि शिष्यवृत्तीच्या गैरव्यवहाराबाबत विद्यापीठात चौकशी सुरू आहे. त्या समिर केणे यांचे व्यवस्थापन परिषदेवर नामनिर्देशन करण्यात आले. विधानपरिषदेवर अभ्यास मंडळाचे सभापती म्हणून नामनिर्देश करण्यात आले. त्यांना पाच वर्षांचा अनुभव नाही. एका प्राध्यापकाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात परीक्षेच्या कामावरून बहिष्कृत करण्यात आले आणि त्यांच्यावर गोंडवाना विद्यापीठातर्फे चौकशी सुरू आहे. त्यांच्या बोगस पीएचडीचे प्रकरण गाजत आहे. विज्ञान व कला शाखेच्या अभ्यास मंडळाचे सभापती म्हणून नामनिर्देश करण्यात आले, ते विभाग प्रमुख नाहीत. मराठी विषयाचा नामनिर्देशीत प्राध्यापकाला साहित्य क्षेत्राचा अनुभव नाही. गोंडवाना विद्यापीठाने कुलगुरूतर्फे सिनेट निवडणुकीची अधिसूचना जाहीर केलेली असतानाही व्यवस्थापन व प्राध्यापक परिषदेची निवड करण्यात आली. आदी माहिती प्राध्यापक संघटनेने आमदार वडेट्टीवार यांना दिली.यावर शहानिशा करून आणि माहितीच्या अधिकारात माहिती घेऊन हा प्रश्न निकाली लावतो, असे आमदार वडेट्टीवार यांनी आश्वासन दिले. मी स्वत: यासंदर्भात रिट पीटीशन (याचिका) दाखल करून गोंडवाना विद्यापीठातील या सर्व नियुक्त्यांचा छडा लावतो, असेही याप्रसंगी आमदार वडेट्टीवार म्हणाले.यावेळी संघटनेचे सचिव डॉ. प्रमोद शंभरकर, उपाध्यक्ष प्रा. डॉ. इसादास भडके, प्रा. सचिन पेटकर, प्रा. नितीन रामटेके, प्रा. रणजित वानखेडे, प्रा. विलास पेटक, डॉ. विलास उमरे, प्रा. गोपीचंद रामटेके यांनी निवेदन सादर करून चर्चा केली. (प्रतिनिधी)
विद्यापीठ टिचर्स असोसिएशनचे वडेट्टीवारांना निवेदन
By admin | Published: May 24, 2015 1:53 AM