चंद्रपूर : वाहनात कोंबून कत्तलीसाठी नेत असताना राजुरा पोलिसांनी बुधवारी देवाडा मार्गावर २२ जनावरांची सुटका केली. गोवंशीय जनावरांची अवैध वाहतूक करणाया सहाजणांना पाच वाहनांसह ताब्यात घेतले. गोपाल समया कुंदाराम (रा. कोस्ताला, ता. राजुरा), बालाजी अरुण थोरात (रा. डोंगरगाव, ता. जिवती), दिलीप किसन बावणे (रा. पांढपौनी राजुरा), अजय बापू मेंगीरवर, सागर श्यामराव मडावी (रा. लक्कडकोट), सय्यद नसीफ सय्यद फैम (रा. गडचांदूर) अशी आरोपींची नावे आहेत.
देवाडा मार्गावरून पाच पिकअप वाहनातून गोवंशीय जनावरांची तस्करी केली जात असल्याची माहिती राजुरा पाेलिसांना मिळाली. त्यावरून पोलिसांनी सापळा रचून देवापूर ते देवाडा मार्गावर पाच पिकअप वाहनांना अडविण्यात आले. तपासणी केली असता २२ जनावरांची अवैध वाहतूक सुरू असल्याचे उघडकीस आले. त्यावरून सर्व २२ जनावरांची सुटका करून लोहारा येथील उज्ज्वल गोरक्षण केंद्रात रवाना करण्यात आले. पाच पिकअप वाहने, जनावरे असा एकूण २३ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
आरोपींविरुद्ध भादंवि ३०१-२३ कलम ११(१) (ड) प्राण्यांचा छळ प्रतिबंध अधिनियम, सह कलम ५ (अ) (ब), ९ महाराष्ट्र पशू संरक्षण अधिनियन २३(१) १७७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक विशाल नागरगोजे यांच्या मार्गदर्शनात तपास अधिकारी एपीआय धर्मेंद्र जोशी व सहकाऱ्यांनी केली.