प्रवीण खिरटकर
वरोरा (चंद्रपूर) : वनपरिक्षेत्र कार्यालय वरोरा अंतर्गत येणाऱ्या सालोरी जंगलात एक वाघीण गळ्यात फास घेऊन मागील २४ दिवसापासून फिरत आहे. तिच्या गळ्यातील फास काढण्याकरता वनविभागाची रेस्क्यू टीम सालोरी जंगलात दाखल झाली आहे. ही टीम जंगलात फिरत आहे, परंतु वाघीण सातत्याने हुलकावणी देत असल्याने वनविभागाची डोकेदुखी वाढली आहे.
वरोरा वनपरिक्षेत्र कार्यालय अंतर्गत येणाऱ्या सालोरी जंगलातील कक्ष क्रमांक ११ मध्ये लावण्यात आलेल्या कॅमेऱ्यामध्ये एक वाघीण गळ्यात फास घेऊन फिरत असल्याचे दिसून आल्यानंतर वनविभाग सतर्क झाला व मागील २४ दिवसापासून शोध मोहीम सुरू केली. काही दिवसांपूर्वी जंगलात तिच्या पायाचे ठसे आढळून आले. जंगलात लावलेल्या कॅमेऱ्यामध्ये गळ्यात फास नसलेली वाघीण दिसून आली. मात्र गळ्यात फास असलेली वाघीण ती नाही, हे वनविभागाला कळले असावे. म्हणूनच वाघिणीच्या शोधार्थ आता रेस्क्यू पथक जंगलात दाखल झाले आहे. सदर पथक सतत जंगलात सर्च मोहीम राबवत आहे. परंतु ही वाघीण अद्यापही गवसली नाही. वाघीण वावरत असलेल्या परिसरात वन्यप्राणी व पाळीव प्राण्याची शिकार झाली नसल्याचे समजते. त्यामुळे वाघीण इतके दिवस उपाशी राहू शकते का, असा प्रश्न पडला आहे.