चंद्रपूर : ऑल इंडिया मेडिकल कोट्यात ओबीसींना २७ टक्के आरक्षण व ईडब्ल्यूएसला १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय शेवटी गुरुवारी केंद्र सरकारने लागू केला. हे राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या आंदोलनाचे मोठे यश असल्याचा दावा करून ओबीसी नेते डॉ. अशोक जिवतोडे यांनी केंद्राच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.
यासंदर्भात केंद्राने नुकतेच निर्देश दिले होते. त्यांची अंमलबजाणी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने यासंदर्भात घेतला. याचा लाभ राज्यातील ओबीसी विद्यार्थ्यांना मेडिकलमध्ये प्रवेश मिळण्यासाठी होणार आहे. राज्यातील मेडिकल प्रवेशित ओबीसी विद्यार्थ्यांना यूजीमध्ये १५ टक्के कोट्यात व पीजीमधे ५० टक्के कोट्यात २७ टक्के आरक्षण सत्र २०२१-२२ पासून मिळणार आहे, याकडेही डाॅ. जिवतोडे यांनी लक्ष वेधले. राष्ट्रीय ओबीसी महासंघाने आजपर्यंत केलेल्या प्रयत्नाचे हे मोठे यश असल्याचे डॉ. जिवतोडे यांनी म्हटले आहे.