चंद्रपूर : मागील अनेक वर्षांपासून काँग्रेसमध्ये काम करीत असलेले तसेच सध्या चिमूर विधानसभा क्षेत्रामध्ये काँग्रेस पक्ष मजबूत करीत असलेले सक्रिय नेते दिवाकर प्रभाकर निकुरे यांनी चंद्रपूर जिल्हा ओबीसी विभाग काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा पक्षश्रेष्ठींकडे सोपवला आहे.
एक महिन्यापूर्वीच पक्षश्रेष्ठींनी त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांची जिल्हा काँग्रेस ओबीसी विभागाच्या जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्ती केली होती. मात्र नियुक्तीपासूनच स्थानिक चिमूर विधानसभामध्ये काँग्रेसचा एक गट त्यांच्या विरोधात थेट प्रदेशाध्यक्षांकडे तक्रारी करीत त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करीत असल्याने तसेच याच गटबाजीमुळे निकुरे यांनी आपला राजीनामा दिल्याचे सांगितले जात आहे. राजीनामासंदर्भात निकुरे यांना विचारले असता आजपर्यंत चिमूर विधानसभेमध्ये पक्ष बांधणीचे काम सुरू होते. तसेच कार्य यापुढेही सुरू राहणार आहे. काम करणाऱ्या माणसाला पदाची आवश्यकता नसते, असे दिवाकर निकुरे म्हणाले.
दरम्यान, येत्या १३ एप्रिलला चिमूर येथे होणाऱ्या 'बहुजनांचा संघर्ष आणि दिशा' या समाजप्रबोधनाच्या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन निकुरे यांनी केले आहे.