लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : अभाविपने देशाच्या अखंडतेसाठी खूप कार्य केले, आता पुन्हा एकदा देशविघातक शक्तींशी चारहात करण्याची वेळ आली आहे. अलगाववाद, उग्रवाद, नक्षलवाद आदींचे आवाहन अद्यापही संपलेले नाही. जेएनयुमध्ये काश्मिरच्या आझादीचे नारे लागतात, हा लांच्छणास्पद विषय आहे. या शक्तींना थांबविण्याचा प्रयत्न सरकार करीत आहेच. नक्षलवाद १०६ जिल्ह्यातून आता केवळ ३५ जिल्ह्यात शिल्लक राहिला आहे, हा त्याचाच परिणाम आहे. मात्र ही विचारसरणी लपून महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये शिरू पाहत आहे. त्याचा सामना करण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने कंबर कसली पाहिजे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केली.अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या ४६ व्या विदर्भ प्रांत अधिवेशनाचे उद्घाटन शनिवार दि. २३ डिसेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता चंद्रपूर येथील क्लब ग्राऊंड मैदानावर (शहीद वीर बाबूराव शेडमाके नगरीत) पार पडले. दीप प्रज्वलन करून अधिवेशनाचे उद्घाटन केल्यानंतर ना. हंसराज अहीर बोलत होते.यावेळी मंचावर अभाविपचे राष्ट्रीय संघटनमंत्री सुनील आंबेकर, सहसंघटनमंत्री जी. लक्ष्मण, विदर्भ प्रांत अध्यक्ष प्रा. स्वप्निल पोतदार, विदर्भ प्रांत मंत्री विक्रमजित कलाने, स्वागत समिती उपाध्यक्ष राहुल पावडे, सहसचिव सुहास अलमस्त, प्रज्वल गारगेनवार प्रभृती उपस्थित होते.अहीर पुढे म्हणाले, बाबासाहेब देशभक्त होते त्यांनी कधीही हिंसेला थारा दिला नाही. अशा महान व्यक्तीचे नाव अलगाववाद्यांनी घेणे चुकीचे आहे. ते थांबले पाहिजे. देशाला तोडणाऱ्यांचा आवाज दाबून राष्ट्रीय विचार प्रसारित झाले पाहिजे. महाविद्यालयामध्ये देशाचा आवाज बुलंद करण्याचे हे काम अभाविपने करावे. शैक्षणिक क्षेत्रात प्रसार माध्यमांची भूमिका पार पाडावी, अशीही आशाही ना. अहीर यांनी व्यावेळी व्यक्त केली.भन्सालीच्या रानी पद्मावती सिनेमावरही अहीर यांनी ताशेरे ओढले. सेंसार बोर्डापर्यंत जाण्याच्या आतच लोकांनी तीव्र प्रतिक्रिया देऊन त्यांना चोख उत्तर दिल्याचे सांगून हीच आपल्या संस्कृतीची ताकद असल्याचे ते म्हणाले, अभाविपने आहे त्यापेक्षा आपली ताकद अधिक वाढवावी, असेही ते म्हणाले.तर अगदी पहिल्या दिवसापासून अभाविप विदर्भात रूजले आहे. अनेकांच्या महत प्रयत्नांनी परिषदेचे काम सातत्याने चालू आहे. हे काम अधिक गतीने पुढे जावे, ही जबाबदारी आपल्या पिढीची आहे. तरुण विद्यार्थी हा ‘न्यूसेन्स पॉवर’ नाही, तर ‘नेशन्स पॉवर’ आहे. हे अभाविपने सिद्ध केले आहे. राष्ट्रवादी विचारांनी प्रेरित या संघटनेकडून देशाला मोठी अपेक्षा आहे, असे सुनील आंबेकर म्हणाले. उद्घाटन कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. स्वप्निल पोतदार यांनी केले. संचालन अभाविपने शाखाध्यक्ष प्रा. योगेश येनारकर तर आभार सुहास अलमस्त यांनी केले.विद्यार्थी संघटनेचे हेच सूत्रअखिल भारतीय विद्यार्थी परिषद हे देशातील सर्वात मोठे विद्यार्थी संघटन आहे. यंदा ३० लाख सदस्यता झाली, हा तसा गौण विषय आहे. अशी आजवरची सदस्यता किती मोठी असेल याची कल्पनाही करता येत नाही, असे मत प्रमुख भाषणात जी. लक्ष्मण यांनी व्यक्त केले.
देशविरोधी शक्तीचा प्रतिकार करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 11:38 PM
अभाविपने देशाच्या अखंडतेसाठी खूप कार्य केले, आता पुन्हा एकदा देशविघातक शक्तींशी चारहात करण्याची वेळ आली आहे. अलगाववाद, उग्रवाद, नक्षलवाद आदींचे आवाहन अद्यापही संपलेले नाही.
ठळक मुद्देहंसराज अहीर : अभाविप विदर्भ प्रांत अधिवेशनात विविध विषयांवर विचारमंथन