लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: आकाशझेप फाऊंडेशन रामटेकद्वारा संचालित आम्ही भारतीय अभियान व गेडाम मित्रपरिवारच्या संयुक्त विद्यमाने माजी सैनिक दिवंगत देवनाथ गेडाम यांच्या स्मृती व तेरावीप्रीत्यर्थ रविवारी स्थानिक गौतम नगरात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत यांच्या मार्गदर्शनात देहदान, अवयवदान संकल्प नोंदणी व सिकलसेल मार्गदर्शन शिबिर पार पडले. यात गेडाम कुटुंबातील ११ जणांनी देहदान व अवयवदानाचा संकल्प केला.कार्यक्रमाला आम्ही भारतीय अभियानाचे मुख्य संयोजक व कार्यक्रमाचे अध्यक्ष साक्षोधन कडबे, प्रमुख मार्गदर्शक डॉ. संजय आसुटकर, डॉ. प्रतीक बोरकर, संतोष सात्रेशवार यांनी उपस्थितांना समयोचित मार्गदर्शन केले. दिवंगत देवनाथ गेडाम हे सेवानिवृत्त सैनिक असल्याने देशावर प्रेम करणे म्हणजेच राष्ट्रधर्म पालन करणे होय. या विचाराप्रमाणे स्वत: जगून मुलांना राष्ट्रपे्रमाचे संस्कार दिले. १३ आॅगस्टला त्यांचे हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या कुटुंबीयांनी तेरावी कार्यक्रम घेण्याऐवजी देहदान व अवयवदान कार्यक्रम घेऊन श्रद्धांजली अर्पण केली.यावेळी स्व. देवनाथ गेडाम यांच्या मुली, जावई, मुले, सुना व नातू, वनिता ठवरे, अनिता देशकर, प्रवीण देशकर, दिनेश गेडाम, क्षितीज ठवरे, तृप्ती इवरे, सोनाली अंगलवार, वंदना मनवर, गीता ठेमसकर, सिद्धार्थ ठेमसकर, सुजाता गेडाम यांनी मरणोपरांत देहदान व अवयवदानाचा संकल्प केला. साक्षोधन कडबे यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी मरणोपरांत देहदान व अवयवदान नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली. गेडाम यांच्या तेरावीनिमित्त जमलेले नातेवाईक व परिसरातील बहुसंख्य नारिकांनी शिबिराचा लाभ घेतला.कार्यक्रमाचे संचालन वनिता गेडाम तर आभार राजेंद्र ठवरे यांनी मानले. यशस्वीतेसाठी डॉ. इरफान अहमद नागपूर, डॉ. चेतन नाईकवार तसेच गेडाम, मित्रपरिवाराने सहकार्य केले.