सर्व विभागांचा सहभाग : क्षेत्र हरित करण्याचा निर्णयसिंदेवाही : सिंदेवाही तालुक्यात वनविभागाने २ लाख ४७ हजार ५०० व इतर विभागातर्फे २५ हजार असे मिळून एकूण २ लाख ७२ हजार ५०० वृक्ष लागवड करण्याचा संकल्प केला आहे. येथील तहसील कार्यालयात तहसीलदार भास्कर बांबोळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी वसंत कामडी, गटविकास अधिकारी बोबडे, तालुका कृषी अधिकारी अजय आटे तालुक्यातील सर्व शासकीय अधिकारी उपस्थित होते.वनविभाग अंतर्गत मुरपार २७ हजार ५००, गुंजेवाही २७ हजार ५००, पवनाचक २७ हजार ५००, पेंढरी २७ हजार ५००, रत्नापूर २७ हजार ५००, कचेपार २७ हजार ५०० मिळून दोन लाख ४७ हजार ५०० व इतर विभागातर्फे तहसील कार्यालय १२५, गटविकास अधिकारी १४ हजार २३५, नगर पंचायत ४००, औद्योगिक प्रशिक्षण संस्था २०, कृषी संशोधन केंद्र १००, बसस्थानक ५०, तालुका कृषी अधिकारी ७ हजार ८८०, उपकोषागार ५, दिवाणी व फौजदारी न्यायालय २०, शेतकऱ्यांचे सागवान वृक्षतोड केलेल्या जागेवर १ हजार १३४, स्मशानभूमीे परिसरात १ हजार मिळून २५ हजार, असे एकूण दोन लाख ७२ हजार ५०० रोपाची लागवड त्या- त्या क्षेत्रातील नियोजित क्षेत्रावर करण्यात येणार आहे. मार्च महिन्यात १५५० मनुष्य बळ लावून खड्डे खोदण्यात आले. वनमहोत्सव कालावधीत एकाच दिवशी तालुक्यात दोन लाख ७२ हजार ५०० रोपाची लागवड केली जाणार असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी वसंत कामडी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. वृक्ष लागवड मोहीम यशस्वी करण्याकरिता तहसीलदार, वनपरिक्षेत्र अधिकारी (वन), वनपरिक्षेत्र अधिकारी (सामाजिक वनीकरण), गटशिक्षणाधिकारी, वनरक्षक, वनपाल, क्षेत्र सहाय्यक कार्यालयातील अधिकारी प्रयत्न करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)
तालुक्यात २ लाख ७२ हजार ५०० वृक्ष लागवडीचा संकल्प
By admin | Published: June 14, 2016 12:35 AM