चंद्रपूर : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत आश्रमशाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित समस्या तत्काळ मार्गी लावण्याबाबत नुकतीच बैठक पार पडली. विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे वतीने प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याची मागणी यावेळी केली. विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सरकार्यवाह सुधाकर अडबाले यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष केशव ठाकरे आणि कार्यवाह श्रीहरी शेंडे यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. या बैठकीत आदिवासी आश्रम शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली.
प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प चंद्रपूर यांच्या दालनात नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीत सहायक प्रकल्प अधिकारी निलय राठोड, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे कोषाध्यक्ष दिगांबर कुरेकर, संघटक मनोज वासाडे, मनोज आत्राम उपस्थित होते.
प्रलंबित समस्यांमध्ये सन २०१९-२०२० मध्ये ४७४ कर्मचाऱ्यांच्या जीपीएफच्या हिशोब याबाबत झालेली कार्यवाही समजून घेण्यात आली. डीसीपीएसधारक १७० पैकी २९ हिशोब पावत्या तयार झाल्याची महिती दिली. उर्वरित १४१ धारकांच्या पावत्या एप्रिलपर्यंत पूर्ण होतील, असे आश्वासन दिले.