१४ गावे शंभर टक्के हागणदारीमुक्त : आतापर्यंत ७३८ शौचालयाचे बांधकामचंद्रपूर : संपूर्ण स्वच्छेतेसाठी शंभर टक्के कुटूंबांकडे शौचालय असणे आवश्यक आहे. त्यासाठीच गेल्या काही वषार्पासून शौचालय बांधकामाची मोहीम मोठ्या प्रमाणावर राबविण्यात येत आहे. वन्य जीवांसह पर्यावरण रक्षणासाठी आपला बहुमोल वाटा देणाऱ्या ताडोबाच्या बफर क्षेत्रातील गावांनीही आता हागणदारीमुक्तीचा संकल्प केला आहे. या क्षेत्रातील १४ गावे हागणदारीमुक्त झाली असून २६ गावे या दिशेने वाटचाल करीत आहे.ताडोबाच्या बफर क्षेत्रातील गावांनी विकासाचे अनेक टप्पे पार केले आहे. वनांच्या संरक्षणासोबतच वन्यप्राण्यांचे संवर्धन व संगोपन या गावांनी केले आहे. देश विदेशातून येणाऱ्या पर्यटकांना व्याघ्र प्रकल्पाची चांगली प्रतिमा आपल्या सोबत घेवून जाता यावे म्हणून या गावांनी स्वच्छ व सुंदरतेचा संकल्प केला आहे. या संकल्पपूर्तीसाठी आरोग्य फार महत्वाचे आहे. त्यामुळे घरोघरी शौचालय बांधून शंभर टक्के हागणदारीमुक्त गावे करण्याच्या दिशेने गावांची वाटचाल सूरु आहे.ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात एकूण ७९ गावांचा समावेश आहे. या गावांमध्ये वनविभागाच्या विविध योजनांमधून विकासाची अनेक कामे केली जात आहे. रोजगाराच्या अनेक संधी या ठिकाणी उपलब्ध झाल्या असून भविष्यात आणखी मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहे. देश-विदेशातून येणाऱ्या पर्यटकांना पर्यटनाचा चांगला आनंद घेता यावा म्हणून या गावांची धडपड आहे. यातील उघड्यावर शौचालयास बसण्याने गावांची खराब होणारी प्रतिमा व बिघडणारे आरोग्य थांबविण्यासाठी या गावांनी शौचालय बांधकामासाठी स्वत:हून पुढाकार घेतला आहे.बफर क्षेत्रातील १४ गावे शंभर टक्के हागणदारीमुक्त झाली आहे. त्यात चंद्रपूर परिक्षेत्रातील चकबोर्डा, हळदी, झरी, पाहणी व पेठ या पाच गावांचा समावेश आहे. मोहुर्ली परिक्षेत्रातील अडेगांव, आगरझरी, मोहुर्ली, जुनोना व सितारामपेठ ही पाच गावे आहेत. याशिवाय शिवणी परिक्षेत्रातील खातेरा, पांगडी व पिंपळहेटी ही तीन गावे तर मुल परिक्षेत्रातील भगवानपूर या गावांचा समावेश आहे.याशिवाय आणखी २६ गावे हागणदारीमुक्तीच्या दिशेने काम करत असून लवकरच ही गावेही हागणदारीमुक्त होणार आहेत. आतापर्यंत बफरक्षेत्रात ७३८ शौचालय बांधण्यात आली आहे. १ हजार ५३८ शौचालये बांधकामाची कामे प्रगती पथावर असून लवकरच ती पूर्ण होणार आहे. शासनाच्या वतीने शौचालय बांधकामाची मोहीम मोठ्या प्रमाणावर राबविली जात आहे. यासाठी प्रति शौचालय बांधकामासाठी १२ हजार रुपयांचे अनुदानही दिले जाते. ताडोबाच्या या गावांमधील शौचालयांसाठीही सदर अनुदान दिले जात आहे. आतापर्यंत ५८ लाख ५६ हजाराचे अनुदान देण्यात आले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
बफर क्षेत्रातील गावांचा हागणदारीमुक्तीचा संकल्प
By admin | Published: October 03, 2016 12:47 AM