मूल : ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. नेहमीप्रमाणे काँग्रेस व भाजप या दोन पक्षात लढत असली तरी तिसरी आघाडी व इतर पक्षांच्या उमेदवारांनी या दोन्ही पक्षाला काही प्रमाणात रोखण्यास यशस्वी ठरल्याचे दिसून आले. भाजपने २२ तर काँग्रेसने २४ ग्रामपंचायतींवर दावा केला. राजकीय वर्चस्वासाठी दावे- प्रतिदावे अजूनही सुरूच आहेत.
आघाडी असलेल्या ग्रामपंचायतीवर आपले समर्थन असल्याची कबुली यावेळी प्रसारमाध्यमाला दिली. यात पहिल्यांदाच शिवसेना, आम आदमी पार्टी, वंचित बहुजन आघाडी व युवा परिवर्तन आघाडीने घेतलेला विजयदेखील चर्चेचा विषय ठरला आहे. सरपंच पदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर घोडेबाजार वाढण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. मा. सा. कन्नमवार यांची कर्मभूमी म्हणून ओळखली जाते. यापूर्वी काँग्रेसची पकड या तालुक्यात होती. मात्र, मतभेदांचा फायदा घेत माजी आमदार शोभा फडणवीस यानी आपला दबाव निर्माण केला. ३० वर्षांपासून भाजपचे वर्चस्व आहे. या तालुक्यात माजी मंत्री तथा विद्यमान आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या विकासकामांबाबत नाव चर्चिले जाते. गावची निवडणूक म्हटली की त्यात पक्षापेक्षा स्थानिक राजकारणाला जास्त महत्त्व दिले जाते. त्याचाच प्रत्यय ग्रामपंचतीच्या निकालावरून आला. गावागावात आपसी मतभेदांमुळे एकाच पक्षाचे उमेदवार एकमेकाविरोधात उभे ठाकल्याने मते विखुरली गेली. त्याचा परिणाम पराभव होण्यास झाला असल्याचे दिसून आले. यात भाजपा असो की काँग्रेस या परीक्षेतून पक्षाला जावे लागल्याचे दिसून येते. आपसातील मतभेदाचा फायदा या निवडणुकीत ८ गावात युवा परिवर्तन आघाडी, शिवसेना, आम आदमी पार्टी, वंचित बहुजन आघाडीने घेतल्याचे दिसून आले. तालुक्यात ३५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत सत्तारूढ असलेल्या पक्षाला जनतेने नाकारत सत्तापरिवर्तन घडवून आणले. भाजपा २२ तर काँग्रेस २४ ग्रामपंचायतींवर सत्ता आल्याचा दावा करीत आहे. मात्र, सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर ज्या पक्षाकडे राखीव गटाचा उमेदवार नसल्यास मोठा घोडेबाजार होण्याची शक्यता आहे. त्यावेळी भाजपा व काँग्रेसने केलेले दावे सत्यात उतरविण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे.