चंद्रपूर : विविध मागण्यांना घेऊन सेवानिवृत्त शिक्षक संघटनेने जिल्हा परिषदसमोर ६ फेब्रुवारीपासून साखळी उपोषण सुरु केले आहे. या मागण्यासंदर्भात अजूनही ठोस तोडगा निघाला नाही. त्यामुळे आता महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व अधिकारी संघटनेच्या वतीने सोमवार दि. २६ फेब्रुवारीपासून अन्नत्याग आंदोलन करणार आहे. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाला संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.
या आहेत मागण्या
सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना गटविम्याची रक्कम त्वरित द्यावी, काल्पनिक वेतन वाढ लागू करावी, सेवानिवृत्त शिक्षकांची एकस्तरची थकबाकी द्यावी, निवृत्त शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांचे पीपीओ आदेश सत्कार प्रसंगी द्यावे, उपदान व अंशराशीकरणाची रक्कम त्वरित द्यावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.
सेवानिवृत्त शिक्षकांच्या अनेक समस्या आहे. गटविमा, अंशराशीकरण रक्कम मिळावी, पेन्शन वेळेत द्यावी यासह अन्य मागण्यांसाठी संघटनेच्या वतीने साखळी उपोषण सुरु करण्यात आले आहे. मागण्या पूर्ण झाल्या नसल्याने २६ फेब्रुवारीपासून अन्नत्याग आंदोलन करण्यात येणार आहे. यासंदर्भात प्रशासनाला निवेदन देण्यात आले. -विजय भोगेकर, जिल्हा मार्गदर्शक,सेवानिवृत्त शिक्षक कर्मचारी संघटना