लोकमत न्यूज नेटवर्क
सिंदेवाही : विभागात मनरेगा अंतर्गत सेल्फवर १७५ कामे असताना अद्याप एकही काम सुरू झाले नाही. ही बाब योग्य नसून, संबंधित सारी कामे तातडीने सुरू करण्याचे आदेश पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी आमसभेत दिले.
तालुक्यातील विकासकामांचा आढावा घेताना २०१६-१७पासून विभागातील घरकुलांची कामे प्रलंबित असल्याबाबत पालकमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली. ही कामे तातडीने पूर्ण करावीत, असे निर्देश देण्यात आले. यावेळी कृषी विभाग, पाणीपुरवठा विभाग, स्वच्छ भारत मिशन, शिक्षण विभाग, एकात्मिक बालविकास, धडक सिंचन विहीर योजना व इतर विभागांचा आढावा घेऊन अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले. ही सामान्य माणसाची कामे तातडीने पूर्ण करावीत, असे सांगितले. यावेळी गटविकास अधिकारी कुणाल उंदिरवाडे, नगराध्यक्ष आशा गंडाटे, मुख्याधिकारी डॉ. सुप्रिया राठोड, जिल्हा परिषद सदस्य रमाकांत लोधे, नायब तहसीलदार धात्रक तसेच पंचायत समिती सदस्य उपस्थित होते.