राज्याच्या कृषी विभागाकडून कृषिभूषण, जिजामाता कृषिभूषण, सेंद्रीय शेती कृषिभूषण, शेतीमित्र, शेतीनिष्ठ शेतकरी आदी पुरस्कार दरवर्षी दिले जातात. प्रयोगशील शेतकरी या पुरस्कारांसाठी विहित नमुन्यात अर्ज सादर करतात. अर्जांची छाननी करून जिल्ह्यातील आठ ते दहा शेतकऱ्यांचे प्रस्ताव विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाकडे पाठविले जातात. कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक फटकाही बसतो. मात्र, शेतीत केलेल्या विविध प्रयोगांची राज्य शासनाने दखल घ्यावी, या हेतूनेही आर्थिक झळ सहन करून शेतकरी अर्ज सादर करीत असतात. कृषी विभागाने केलेल्या आवाहनानुसार, २०२० मध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी विहित नमुन्यात अर्ज सादर केले होते. एक वर्षानंतर हे प्रस्ताव परत पाठवून सुधारित प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना राज्य कृषी विभागाने जारी केल्या. प्रस्ताव वर्षभर अडवून अखेरच्या क्षणी सुधारित प्रस्तावांचा निर्णय जाहीर झाल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
कृषी पुरस्कारासाठी वर्षभरानंतर मागविले सुधारित प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 4:28 AM