चंद्रपूर : सध्या महिलांनी प्रत्येक क्षेत्रात प्रगती साध्य केली आहे. अनेक ठिकाणी पुरुषांची मक्तेदारी मोडीत काढून तिथेही त्यांनी आपले नाव कोरले आहे. असाच प्रकार मूल तालुक्यातील बेंबाळ या गावात घडला आहे.
आठवडी बाजार, तसेच गुजरीचा ठेका घेण्यासाठी ग्रामपंचायतीने लावलेल्या बोलीमध्ये सर्वाधिक बोली लावत भरारी महिला ग्रामसंघ बेंबाळ येथील उमेदच्या महिलांनी बाजार, तसेच गुजरी घेत यामध्येही आम्ही कमी नसल्याचे दाखवून दिले आहे.
बेंबाळ येथील ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच करुणा उराडे, ग्रामसेवक सुखदेवे साहेब, उपसरपंच मुन्ना कोटरंगे व सर्व ग्रामपंचायत सदस्यांच्या उपस्थितीत आठवडी बाजार व गुजरी ठेका लिलावाची प्रक्रिया पार पडली. बोली लावणारे अनेक कंत्राटदार यावेळी उपस्थित होते. यात पुरुषांची संख्या अधिक होती. आठवडी बाजाराची बोली सुरू झाली. एकावर एक बोली लावणारे बोली लावत होते. शेवटी भरारी महिला ग्रामसंघ बेंबाळ यांनी तब्बल ८१ हजार रुपयांची सर्वाधिक बोली लावली आणि उपस्थित सर्वांच्याच भुवया उंचावल्या.
सदर लिलाव प्रक्रियेदरम्यान महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष पंचायत समिती मुलअंतर्गत भरारी महिला ग्राम संघाच्या अध्यक्ष वंदना बोम्मावार, सचिव प्रणिता गड्डलवार, कोषाध्यक्ष रूपाली घोटेकर, लेखापाल प्रियंका भंडारे, आयसीआरपी विशाखा धाबर्डे, कविता निलमवार, ग्रामसंघातील इतर महिला व गावातील नागरिक उपस्थित होते.
बाॅक्स
आठवडी बाजारात व्यापारी, शेतकरी व नाना प्रकारचे ग्राहक येतात. बाजाराची फी घेण्यावरून अनेकदा वादविवाद होतात. त्यामुळे बाजार ठेकेदारीत महिला लक्ष देत नाहीत. मात्र, उमेद अभियानाने प्रेरित भरारी महिला ग्रामसंघ बेंबाळ येथील महिलांनी नवा प्रयोग हाती घेतला आहे. सर्वाधिक बोली लावून ८१ हजार रुपयांनी ठेका आपल्या नावावर करून घेतला.