लोकमत न्यूज नेटवर्कब्रम्हपुरी : तालुक्यातील कन्हाळगाव येथील मोहन बागडे यांच्या शेतावरील धानाचे पुंजणे आगीत भस्मसात झाल्याची घटना शुक्रवारी पहाटे ५ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.कन्हाळगाव येथील रहिवासी मोहन बागडे यांच्या मालकीची गावात तीन ऐकर शेतजमीन असून शेतातील धानाची कापणी करून पुंजने तयार करण्यात आले होते. सदर पुंजने २९ नोव्हेंबरला पहाटे ५ वाजताच्या सुमारास आगीत भस्मसात झाल्याचे उघडकीस आले आहे.यावर्षी पाऊस बऱ्यापैकी पडल्याने धानाचे पीक चांगले आले होते. केलेला खर्च निघणार याची पूर्ण खात्री होती. अशातच शेतातील तीन एकराचे सहाशे भारे असलेले धानाचे पूंजने आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्याने सदर शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्याचे अंदाजे एक लाखाच्यावर नुकसान झाले आहे. सदर घटनेची तक्रार ब्रम्हपुरी पोलीस स्टेशन व तहसीलदार ब्रम्हपुरी यांच्याकडे करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. विशेष बाब म्हणजे याच भागातील पूंजने जळाल्याची ही तिसरी घटना असून काही दिवसाआधी भालेश्र्वर, कोलारी व कन्हाळगाव आदी ठिकाणी अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे शेतकरी भयभीत आहेत.
धानाचे पुंजणे आगीत भस्मसात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2019 12:43 AM