उपरी : सावली तालुक्यात येणार्या अनेक स्वस्त धान्य दुकानात मागील दोन महिन्यांपासून निकृष्ठ दर्जाचा धान्य पुरवठा होत असल्याने ग्राहकांत असंतोष पसरला आहे. ग्राहकांची बोंब असूनही संबंधित विभाग मात्र या समस्येकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे नागरिकात शासनाच्या कार्यप्रणालीबाबत रोष व्यक्त केला जात आहे. केंद्र सरकारने मागील तीन महिन्यापूर्वी नागरिकांना स्वस्त धान्य दुकानातून तांदुळ ३ रु. प्रति किलो तर गहू २ रु. प्रति किलो प्रमाणे धान्य पुरवठा करण्याचा निर्णय घेतला. हे धान्य अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत प्रति व्यक्ती ५ किलो धान्य देण्याची अंमलबजावणी केली. यात अंत्योदय, बिपीेल कार्डधारकांचा समावेश आहे. यापूर्वी एका राशन कार्डवर ३५ किलो धान्य मिळत होते. मात्र अन्न सुरक्षा योजना आल्यापासून अंत्योदय कार्ड धारकांना ३५ किलो धान्य तर बिपीएल कार्डधारकांना प्रत्येक मताला ५ किलो धान्य देण्यात येत आहे. यामुळे बर्याच कुटुंबाना या योजनेचा फटका बसला आहे. दोन-तीन जणांचे कुटुंब असल्यास त्या कुटुंबास फक्त १० ते १५ किलो धान्य मिळत आहे. यात महिनाभराचे राशन घेणे कठीण झाले आहे. त्यामुळे या योजनेत सुधारणा करून पूर्वीप्रमाणे ३५ किलो धान्य देण्यात यावे, अशी मागणी केली जात आहे. तर दुसरीकडे एपीेल काळे धारकांचे तांदुळ गहू पुर्णत: बंद झाल्याने कार्ड धारकांना धान्य पुरवठा करण्यात यावा अशीही मागणी होत आहे. सदर योजना लागू झाल्यापासून मागील तीन महिन्यापासून साखर पुरवठा बंद पडला असल्याने स्वस्त धान्य दुकानातील साखर नागरिकांसाठी कडू झाली आहे. तर दुसरीकडे स्वस्त दरात धान्य पुरवठा होत असल्याने स्वस्त धान्य दुकानात येणारा गहू निकृष्ट दर्जाचा, सडका पद्धतीचा येत आहे. स्वस्त धान्य दुकानदार त्या गव्हाची विल्हेवाट कार्डधारकांकडे लावत आहे. त्यामुळे नागरिकात बोंब उडाली आहे. शासनाने नागरिकांना स्वस्त दरात धान्य पुरवठा करण्याचा निर्णय घेतला असला तरी निकृष्ठ दर्जाच्या धान्य पुरवठामुळे शासनाच्या योजनेच्या बाबत संभ्रम निर्माण झाला आहे. तेव्हा शासनाने यावर ठोस भुमिका घेऊन स्वस्त धान्य दुकानात उत्कृष्ठ दर्जाचा धान्य पुरवठा करावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे. (वार्ताहर)
स्वस्त धान्य दुकानातून निकृष्ट धान्याचा पुरवठा
By admin | Published: May 22, 2014 11:47 PM