राजू गेडाम
मूल : शहराच्या मध्यभागी असलेल्या राईस मिल मुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. राईस मिलच्या कोंड्यामुळे उग्र वास येत असल्याने जीव कासावीस होत असून धानाचा कोंडा थेट घरी जात असल्याने विविध श्वसनाचे आजार जडत आहेत.
या संदर्भात नागरिकांनी अनेकदा तक्रार केल्यानंतरही त्याकडे दुर्लक्ष केले जात होते. नागरिकांच्या दबावामुळे मूल नगर परिषदेने शहरातील राईस मिल मुळे होणारा त्रास लक्षात घेता मिल शहराबाहेर हटविण्याचा निर्णय १९ महिन्यापूर्वी घेतला. मात्र अंमलबजावणीकडे दुर्लक्ष केले जात असल्याने नागरिकांना अनेक आजारांचा सामना करावा लागत आहे.या गंभीर बाबीकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
मूल शहरात धानाचा व्यावसाय मोठ्या प्रमाणात असून राईस मिलची संख्या सर्वाधिक आहे. आजच्या स्थितीत बहुतांश राईस मिल चामोर्शी महामार्गावरील नव्याने बांधण्यात आलेल्या आहेत. मात्र मूल नगर परिषदेअंतर्गत वाॅर्ड नं.११ मधील भारत राईस मिल व दत्त राईस मिल या दोन राईस मिल मुळे वॉर्डातील नागरिकांना फार मोठा त्रास सहन करावा लागत आहे. राईस मिलमधून निघणारा कोंडा, बारीक भुसा थेट नागरिकांच्या स्वयंपाकघरात शिरत असल्याने तो भुसा खाण्या पिण्याच्या भांड्यावर पडत आहे. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. वेळोवेळी झाडलोट केल्यानंतरही काही वेळातच जैसे थे परिस्थिती निर्माण होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. दुसरी बाब म्हणजे राईस मिलमधून निघणारा कोंडा आवारातच जमा करून ठेवला जात असल्याने पावसाळ्याच्या दिवसात तो कुजतो. त्यावर डुकरे व इतर जनावरे रात्रंदिवस बसून राहत असल्याने आरोग्यासाठी घातक ठरत आहे. त्यातच त्या कोंड्याची दुर्गंधी संपूर्ण परिसरात पसरल्याने नागरिक वैतागले आहे. कोंड्याची डस्ट नागरिकांच्या नाका तोंडात जात असल्याने श्वसनाचा व दम्याचा त्रास वाढला आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने डेंग्यू, मलेरिया, टायफाॅईड यासारखे आजार बळावले असल्याचे दिसून येत आहे.
बॉक्स
प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार
त्रस्त नागरिकांनी मूल नगर परिषद व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ चंद्रपूर यांच्याकडे याबाबत तक्रार दिली आहे. मात्र नाममात्र चौकशी करण्याचा देखावा प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. मूल शहरातील मध्यभागी असलेल्या राईस मिल शहराबाहेर हटविण्यासंदर्भात नगर परिषदेने २७ फेब्रुवारी २०२० च्या सर्वसाधारण सभेत ठराव क्रमांक ८५ नुसार ठराव संमत करण्यात आला. आजच्या स्थितीत १९ महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला असताना या ठरावाची अंमलबजावणी होत नसल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली आहे. नागरिकांच्या आरोग्याकडे लक्ष घालून होणारा त्रास टाळण्यासाठी त्वरित ठरावाची अंमलबजावणी करावी, अशी मागणी आहे.
कोट
मूल शहरातील मध्यभागी असलेल्या या दोन राईस मिल मुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. माझे वास्तव्य याच वाॅर्डात असल्याने मला या संदर्भातील माहिती आहे. त्यामुळेच या राईस मिल शहराबाहेर हटविण्याचा ठराव नगर परिषदेने घेतला आहे. लवकरच या ठरावाची अंमलबजावणी केली जाणार आहे.
-नंदकिशोर रणदिवे, उपाध्यक्ष, नगर परिषद मूल
कोट
भारत राईस मिल व दत्त राईस मिल मुळे नागरिकांना फार त्रास सहन करावा लागत आहे. घरातील लहान मुले विविध आजाराने ग्रासले असल्याचे दिसून येत आहे. कोंडा थेट घरात येत असल्याने तो नाकातोंडात जात आहे.
-मुन्ना घुटके, नागरिक, मूल.