रवी जवळे ।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : उन्हाळ्यातील उष्णता आणि चंद्रपूर शहर या दोघांचा अतूट संबंध आहे. उन्हाळ्यात सूर्य चंद्रपूर शहराच्या माथ्यावर असतो की काय, असाच तापमानाचा अंगारा असतो. एप्रिल महिन्यात पारा ४६.५ अंशापार गेला आहे. अद्याप ‘मे हीट’चा सामना व्हायचा आहे. मात्र गंभीर व चिंतन करायला लावणारी बाब वेगळीच आहे. ती म्हणजे चंद्रपूरचे वाढते किमान तापमान. दिवसभर उन्हाचे चटके सोसल्यानंतरही चंद्रपूरकरांना रात्री उष्ण झळांचा सामना करावा लागत आहे. राज्यातील इतर शहराच्या तुलनेत चंद्रपूरचे रात्रीचे तापमान अधिक नोंदविले जात आहे. आताच ते ३० अंशापार गेले आहे. याबाबत गंभीरतेने विचार करणे गरजेचे आहे.मागील काही दिवसांपासून चंद्रपूरकरांवर सूर्य कोपल्याचे दिसून येत आहे. तापमानात सातत्याने वाढ होत आहे. या आठवड्यात मंगळवारी ४३.४ अंश सेल्सिअस तापमान होते. बुधवारी ४४.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. गुरुवारी ४५.५ अंश सेल्सिअस, शुक्रवारी ४५.६ अंश सेल्सिअस आणि आता आज शनिवारी तब्बल ४६.५ अंश सेल्सीयसपर्यंत कमाल तापमानाने मजल गाठली आहे. यामुळे जनजीवन प्रभावित झाले आहे. या उष्णतेमुळे चंद्रपूरकर धास्तावले आहेत.मात्र यापेक्षाही अधिक चिंता करायला लावणारी बाब किमान तापमान ही आहे. राज्यातील इतर शहरातही सध्या उष्णतेच्या लाटेमुळे पारा ४५ अंशापार गेला आहे. मात्र तेथील तापमान रात्री झपाट्याने खाली येते. त्यामुळे सायंकाळनंतर नागरिकांना चांगला दिलासा मिळतो. रात्री हवेत गारवा असतो. मात्र चंद्रपुरात तसे नाही. येथील किमान तापमानही दिवसेंदिवस वाढत आहे. या आठवड्यात किमान तापमान २७ अंशाच्या वर नोंदविले जात आहे. मंगळवारी २७.२ अंश, बुधवारी २७ अंश सेल्सिअस, गुरुवारी २९ अंश सेल्सिअस, शुक्रवारी तब्बल ३० अंश सेल्सिअस तर आज शनिवारी ३०.६ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. याचाच अर्थ चंद्रपूर शहर झपाट्याने थंड होत नाही, हे स्पष्ट होत आहे.हवेतील घटक कारणीभूतचंद्रपुरातील वाढते किमान तापमान खरेच चिंताजनक आहे. याला अनेक बाबी कारणीभूत आहेत. चंद्रपूर परिसरात ३० च्यावर कोळसा खाणी आहेत. वीज केंद्र व इतर कारखाने आहेत. त्यामुळे येथील हवेत कार्बन डायआॅक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, मिथेन व डस्ट पार्टीकल हे घटक अधिक आढळतात. या घटकामुळे पृथ्वीवरून परत जाणारी बहुतांश ऊर्जा येथे अडविली जाते. यामुळे शहर लवकर थंड होत नाही. - प्रा.योगेश दुधपचारे, हवामान अभ्यासक
चंद्रपूरचे वाढते किमान तापमान धडकी भरविणारे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 11:26 PM
उन्हाळ्यातील उष्णता आणि चंद्रपूर शहर या दोघांचा अतूट संबंध आहे. उन्हाळ्यात सूर्य चंद्रपूर शहराच्या माथ्यावर असतो की काय, असाच तापमानाचा अंगारा असतो. एप्रिल महिन्यात पारा ४६.५ अंशापार गेला आहे. अद्याप ‘मे हीट’चा सामना व्हायचा आहे.
ठळक मुद्देकिमान पाराही ३० अंशापार । उन्हाळ्यातील रात्रीचा गारवाही चंद्रपूरकरांच्या नशिबी नाही