घुग्घुस : कोळसा खाणीत काम करताना स्वतः सुरक्षित राहून यशस्वीपणे कोळसा उत्पादनाचे काम कसे करता येईल, याकडे लक्ष देण्याचे आवाहन क्षेत्रीय सुरक्षा अधिकारी एस. पी. सिंग यांनी केले.
वेकोली वणी क्षेत्राच्या नीलजई उपक्षेत्रांतर्गत येत असलेल्या बेलोरा नायगाव या खुल्या कोळसा खाणीत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.
यावेळी मंचावर क्षेत्राचे सुरक्षा अधिकारी एस. पी. सिंग यांच्यासह प्रबंधक राजकिशोर आचार्य, उत्खनन अधिकारी डी. पी. पाटील उपस्थित होते.
कोळसा खाणीत काम करताना खाण कामगारांना अनेक धोके पत्करून काम करावे लागते. त्यामुळे धोके टाळण्यासाठी व योग्य रितीने उत्खननाचे कार्य कसे करता येईल, यासाठी योग्य मार्गदर्शन आवश्यक असून, या कार्यशाळेद्वारे ते मिळू शकेल, असा विश्वास सिंग यांनी यावेळी व्यक्त केला. खाण प्रबंधक राजकिशोर आचार्य यांनी आपल्या प्रास्ताविकातून कोळसा क्षेत्रात काम करताना निर्माण होणाऱ्या धोक्याची माहिती देऊन ते कसे टाळता येईल, याविषयी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेला सहाय्यक उत्खनन अधिकारी संजय काळमेघ, विद्युत अभियंता सुरेशसिंग गौर, ब्लास्टिंग अधिकारी राजेंद्र नाईक, डीव्हीएस रेड्डी, विजयकुमार आदींसह कामगारवर्गाची उपस्थिती होती. या कार्यशाळेचे प्रास्ताविक राजकिशोर आचार्य यांनी केले. सुरक्षा अधिकारी प्रशांत पाचपोर यांनी संचालन केले. राजेंद्र नाईक यांनी आभार मानले.