चंद्रपूर : मंगळवार आणि बुधवारी काही वेळ रिमझिम पाऊस आला असला तरी पावसाने या दोन दिवसात बऱ्यापैकी उसंत घेतली. मात्र इतर जिल्ह्यातील व चंद्रपूर जिल्ह्यातील इरई धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूच असल्याने जिल्ह्यातील नदीकाठावरील गावांना अद्याप पुराचा वेढा आहे. काही मार्ग अजूनही बंदच आहेत.
वरोरा तालुक्यातील नऊ गावांना फटका
वरोरा तालुक्यातील वर्धा नदीच्या काठावरील गावांना पुराचा वेढा कायम असून युद्धपातळीवर मदतकार्य सुरू आहे. तब्बल नऊ गावांना पुराचा फटका बसला. या गावांमधील १५०० लोकांना आतापर्यंत सुरक्षितस्थळी हलविले असून मदतकार्य सुरू आहे. तालुक्यातील करंजी, आष्टी कुचना,पाटाळा, माजरी, नागरी, सोईट निलजई आमडी, दिंडोडा, बांबर्डा इत्यादी गावांमध्ये पूरपरिस्थिती कायम आहे. यामध्ये अनेक घरांची पडझड झाली असून घरात ठेवलेले खत आणि बी-बियाणे वाहून गेल्याने शेतकरी चिंतेत आहे. पूर परिस्थिती बघता आतापर्यंत जवळपास १२० कुटुंबांना जिल्हा परिषद शाळा माजरी आणि वरोरा येथील काही मंगल कार्यालयात हलविले असून त्यांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. खैरी वडकीकडे जाणारा मार्ग अजूनही बंद आहे. तसेच या पुलाचे प्रचंड नुकसान झालेले आहे. याशिवाय वणीकडे जाणारी वाहतूकही थांबविण्यात आली आहे. एचडीआरएफच्या दोन चमू व एनडीआरएफच्या दोन चमू बचाव पथक म्हणून तैनात केले आहे.
किर्र अंधार अन् पुराचा वेढा
वर्धा नदीला आलेल्या पुरामुळे माजरीजवळच्या पाटाळा येथील गावकऱ्यांचे जनजीवन विस्कळीत झाले असून कित्येक कुटुंबांनी गाव सोडून सुरक्षित ठिकाणी आश्रय घेतला आहे. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत पाटाळा गावामधून जवळपास ३५० लोकांना बोटीने कुचना येथे हलविण्यात आले. तर मणगाव येथे बुधवारी सकाळी गावाच्या सभोवताली पाणी झाल्याने १५० लोकांना बोटीच्या साहाय्याने कुचना येथे नेण्यात आले. पुरातून बाहेर काढलेल्या लोकांची राहण्याची, जेवण्याची सोय वेकोलीने सामुदायिक भवन कुचना येथे व नागलोन व कुचना ग्रामपंचायतीनेसुद्धा जनतेची राहण्याची सोय केली आहे. माजरी वस्तीमध्ये आठ फूट पाणी साचले असून जि.प. शाळा, पोलीस स्टेशन, प्राथमिक आरोग्य केंद्रातही पाणी शिरले आहे. पूर असलेल्या मनगाव, राळेगाव, थोरणा, पाटाळा,पळसगाव, माजरी येथे वीजपुरवठा नसल्याने रात्री किर्र अंधार असतो.
जुनगावचा संपर्क तुटला
वैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे पोंभुर्णा तालुक्यातील जुनगाव पाण्याने वेढले आहे. त्यामुळे जुनगावचा संपर्क आठ दिवसांपासून इतर गावांशी तुटला आहे.
लाखोंचे रासायनिक खत पाण्यात
राजुरा विधानसभा क्षेत्रातील राजुरा, गोंडपिपरी, कोरपना व जिवती तालुक्यात झालेल्या संततधार पावसामुळे सर्वत्र शेतात पुराचे पाणी साचले आहे. शेतकऱ्यांनी शेतात वर्षभरासाठी शेत पिकांकरिता साठविलेले रासायनिक खत पाण्यात विरघळले तर बहुतांश खत पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. शासनाने विशेष बाब म्हणून शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे.
बल्लारपूर तालुक्यातील हे मार्ग बंद
पाण्याचा प्रकोप वाढत असल्याने कोठारी - तोहगाव, बल्लारपूर- राजुरा, सास्ती- राजुरा, कोठारी - कवडजई, माना - चारवट-हडस्ती, पळसगाव - कवडजई हे मार्ग बंद झाले आहे. बल्लारपूर तालक्यातील पळसगाव परिसरात अनेक शेतकऱ्यांनी रोवणी सुरू केली आहे. रोवणी सुरू असताना संपूर्ण पऱ्हे काढून पूर्ण शेतात पसरवून ठेवले होते. सोमवारी व मंगळवारी अचानक नाल्याला आलेल्या पुराने, काढून ठेवलेले पऱ्हे वाहून गेले आहे. याशिवाय बामणी-राजुरा मार्गावर वर्धा नदीचे पाणी एक किलोमीटर समोर आले आहे.
कोरपना तालुक्यातही काही मार्ग बंदच
वणी ते कोरपना मार्गाची अत्यंत दुरवस्था झाली आहे. त्यामुळे वणी तालुक्यातील शिरपूरजवळ कंटेनर फसला आहे. याला दोन दिवस उलटूनही काढण्यात न आल्याने सद्य:स्थितीत एकेरी वाहतूक सुरू आहे. त्याचा फटका जाणाऱ्या येणाऱ्या प्रवाशांना बसतो आहे, तर वर्धा नदीला आलेल्या पुरामुळे भोयगाव ते धानोरा मार्ग बंद पडलेला आहे. परिणामी वाहनाच्या लांबच लांब रांगा रस्त्याने लागल्या आहे. राजुरा-कवठाला मार्गावर गोवरीजवळ ट्रक फसल्याने हाही मार्ग १५ तासांपासून ठप्प पडला आहे. वर्धा नदीवरील राजुरा, सास्ती, घुग्घुस, मुंगोली, पाटाळा या चार प्रमुख पुलावर पाणी असल्याने कोरपनासह राजुरा, जिवती तालुक्याचा जिल्हा मुख्यालय चंद्रपूरशी संपर्क तुटला आहे. कोरपना-भोयगाव मार्गही बंदच आहे. याशिवाय तेलंगणाकडे जाणारी आंतररज्यीय वाहतूकही बंद आहे.