लोकमत न्यूज नेटवर्कमूल : शेत पाणंद रस्ते हे प्रामुख्याने शेतीमधील कामाकरिता आवश्यक साधनांची ने-आण करण्याकरिता उपयोगात येतात. यांत्रिकीकरणामुळे शेतीमध्ये पेरणी, आंतरमशागत, कापणी, मळणी यासारखी कामे यंत्रांमार्फत करण्यात येतात. अशा यंत्र सामग्रीची वाहतूक करण्याकरिता पावसाळ्यातही शेत पाणंद रस्ते सुयोग्य असणे काळाची गरज आहे. मात्र, जुलै महिन्यात पडलेल्या संततधार पावसामुळे या पाणंद रस्त्यांची दैना झाली आहे.
शासनाने बळीराजा व मातोश्री पाणंद योजनेंतर्गत मूल तालुक्यात कोटी रुपये खर्चुन तीन महिन्यांपूर्वी पाणंद रस्त्यांचे खडीकरणाचे काम केले. मात्र तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे काही रस्ते वाहून गेले तर काही रस्ते पूर्णतः उखडल्याने या रस्त्याने वाहतूक बंद झाली आहे. त्यामुळे ऐन हंगामात शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत असल्याने पाणंद रस्ते दुरुस्तीसाठी शासनाने तत्काळ निधी उपलब्ध करून द्यावा व रस्त्यांची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
शेतीमधील दिवसेंदिवस कमी होणाऱ्या मनुष्यबळाच्या उपलब्धतेमुळे कृषी क्षेत्रामध्ये यांत्रिकीकरण ही अपरिहार्य बाब झाली आहे. शेतमाल बाजारात पोहोचविण्याकरिता तसेच यंत्रसामग्री शेतापर्यंत जाण्यासाठी शेतीला बारमाही पाणंद रस्त्यांची गरज आहे. असे शेतरस्ते हे रस्ता योजनांमध्ये येत नसल्याने विविध स्रोतांमधून निधीच्या उपलब्धतेबाबत अडचणी निर्माण होत होत्या.
यावर मात करून शेतकऱ्यांना शेतात वाहतुकीयोग्य रस्ते उपलब्ध व्हावेत, यासाठी शासनाने विविध योजनांच्या अभिसरणामधून शेत पाणंद रस्ते योजना राबविण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला. मूल तालुक्यात बळीराजा समृद्धी मार्ग शेत पाणंद रस्ते अंतर्गत चिमडा, येरगाव, टेकाडी, मारोडा व केळझर येथे जवळपास २ कोटी २० लाख रुपये तर मातोश्री पाणंद रस्ते योजनेंतर्गत उश्राळा, उश्राळाचक, चकदुगाळा, नांदगाव येथील पाणंद रस्त्यांच्या खडीकरणासाठी जवळपास १ कोटी ७६ लाख रुपये खर्च करण्यात आले. या पाणंद रस्त्यांचे खडीकरण झाल्याने शेतकऱ्यांना शेतात जाणे सोयीस्कर झाले होते.
रस्त्यांची तत्काळ दुरुस्ती करामागील महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे काही पाणंद रस्ते वाहून गेले तर काही रस्ते पूर्णतः उखडल्याने या रस्त्यांवरील वाहतूक बंद झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतात चिखल करण्यासाठी ट्रॅक्टर, खते व शेतीपयोगी साहित्य नेण्यास मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे शासनाने या पाणंद रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.
"मातोश्री पाणंद रस्ते योजनेंतर्गत खडीकरणाचे काम करण्यात आले होते. त्यामुळे पाणंद रस्त्याने शेतात ये-जा करणे सुलभ झाले होते. मात्र, अतिवृष्टीमुळे रस्त्याचा काही भाग वाहून गेल्याने त्यावरून वाहतूक बंद झाली आहे. शेतात जाण्यासाठी अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे शासनाने तत्काळ पाणंद रस्त्यांची दुरुस्ती करून द्यावी."- विनोद जीवतोडे, शेतकरी, उश्राळा.