विकास खोब्रागडेलोकमत न्यूज नेटवर्क पळसगाव (पिपर्डा): 'जलजीवन मिशन' अंतर्गत घराघरांत पिण्याचे पाणी पोहोचविण्याचे शासनाचे उद्दिष्ट आहे. प्रत्येकाच्या घरात पिण्याचे पाणी पोहोचल्यानंतर महिलांच्या डोक्यावरील पाण्याचा हंडा कायमचा उतरणार होता. शासनाची चांगली योजना आहे. ही योजना गोंडमोहाळी येथे राबवित आहे. त्यासाठी रस्ता खोदला, पाइपलाइनही टाकली. मात्र, तीन महिन्यांपासून पाण्याचा एक थेंबही नागरिकांना मिळाला नाही.
जलजीवन मिशन योजनेंतर्गत गावागावांत पावसाळ्यापूर्वी नवीन पाइपलाइन टाकण्याचे काम सुरु करण्यात आले. त्यासाठी गावातील सिमेंट काँक्रीटचे मजबूत रस्ते मध्यभागातून खोदण्यात आले. मात्र, चिमूर तालुक्यातील विहीरगाव तुकूम ग्रामपंचायतअंतर्गत येणाऱ्या गोंडमोहाळी गावातील पाणीपुरवठा नळ योजनेसाठी खोदलेल्या खड्ड्यात तीन महिन्यांपासून पाइपलाइन टाकण्यात आली. मात्र, अजूनही नळाला पाणी नाही.
महिलांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांवर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. गावातील पाणीपुरवठा योजनेचे काम लवकरच पूर्ण होईल म्हणून गावकरी समाधानी होते. मात्र, तीन महिन्यांनंतरही गोंडमोहळी येथील खोदलेल्या रस्त्यात पाइपलाइन टाकण्यात आली. मात्र, नळाला पाणी न आल्याने नागरिकांत नाराजी आहे. मोटार दुरुस्तीचे उर्वरित काम तातडीने पूर्ण करून नळाला पाणी द्यावे, अशी मागणी गोंडमोहाळी येथील नागरिकांनी केली आहे.
"मोटारपंपात बिघाड आल्यामुळे दुरुस्तीकरिता दुकानात पाठविण्यात आला आहे. दुरुस्ती दूरुस झाली की लगेच आज किंवा उद्या पंप लावून पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येईल."-प्रमानंद गुरनुले, सरपंच, विहीरगाव (तुकूम