नियोजनशून्य बांधकामाचा नागरिकांना फटका
लोकमत न्यूज नेटवर्क
सास्ती : राजुरा शहर स्वच्छ व सुंदर बनविण्याकरिता नानाविध कामे केली जात आहेत. राजुरा शहरातील रस्ते बांधकाम, नाले बांधकाम तसेच रस्त्यांच्या कडेला पेव्हर ब्लाॅक लावण्याचेही काम करण्यात आले. यामुळे रस्ते सुशोभित तर झाले, परंतु पहिल्याच पावसात नियोजनशून्य बांधकामाचे पितळ उघडे पडले.
पेव्हर ब्लाॅक बसवताना योग्य उतार न दिल्यामुळे रस्त्यावर पाणी साचून नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला असून, या बांधकामाची दुरूस्ती करण्याची मागणी केली जात आहे.
राजुरा शहरातील विविध भागात रस्त्याकडेला पेव्हर ब्लाॅक लावण्याचे काम हाती घेण्यात आले होते. शहरातील विविध प्रभागातील रस्त्यांच्या कडेला हे ब्लाॅक लावण्याचे काम करण्यात आले. त्यासाठी नागरिकांनी आपल्या घरातील पाणी वाहून जाण्याकरिता ज्या काही लहान-मोठ्या नाल्या किंवा उपाय केले होते, ते यामुळे बंद करण्यात आले. त्याठिकाणी खोदकाम करून रस्त्याकडेला ब्लाॅक बसविण्यात आले. हे ब्लाॅक बसवताना नागरिकांनी योग्य उतार काढून पाणी वाहते होईल या पद्धतीने बांधकाम करण्याची विनंती कंत्राटदाराला वेळोवेळी केली. परंतु, केवळ ब्लाॅक लावणे व कामाच्या पैशाची उचल करणे हेच धोरण आखून बांधकाम करण्यात आले. शुक्रवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे या बांधकामाचे पितळ उघडे पडून शहरातील विविध भागात रस्त्यांवर पाणी साचल्याचे दिसून आले. जवाहर नगर प्रभागातही हीच स्थिती होती. याठिकाणी रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.