दिलीप मेश्राम
नवरगाव : सिंदेवाही तालुक्यातील अगदी शेवटच्या टोकावर वसलेल्या खांडला, सरांडी येथील विद्यार्थ्यांना जंगलातून सायकलने २६ किलोमीटरचा प्रवास करून नवरगावला शिक्षणासाठी जावे लागते. या जंगलात वाघ, बिबट्या व अनेक हिंस्र प्राणी आहेत. वाघाच्या दहशतीतच त्यांना जीव मुठीत घेऊन मार्गक्रमण करावे लागते.
खांडला, सरांडी ही दोन्ही गावे तालुक्याच्या टोकावर वसलेली आहेत. या गावांना चहूबाजूंनी जंगलाने वेढलेले असून, आदिवासीबहुल गावे आहेत. सकाळी उठल्यापासून ते रात्रीपर्यंत ग्रामस्थांचा जंगलाशी संबंध येतोच. नवरगावपासून खांडला दहा किलोमीटर तर सरांडी हे गाव १३ किलोमीटरवर आहे. शिवाय किराणापासून ते आरोग्य, शिक्षणाच्या सोयी मिळविण्यासाठी नवरगावलाच यावे लागते.
खांडला, सरांडी या दोन्ही गावांमध्ये चौथीपर्यंतच शिक्षणाची सोय आहे. पुढील शिक्षणासाठी खांडला येथील १२ ते १३ व सरांडी येथील १९ ते २० विद्यार्थ्यांना यावर्षी नवरगावला यावे लागत आहेत. काहींचे पालक दुचाकीने आणून सोडतात तर बरेच विद्यार्थी जंगलाचा रस्ता तुडवत सायकलने ये -जा करत आहेत. हा प्रवास करताना या जंगलात वाघ, बिबटे, अस्वल अशा हिंस्र प्राण्यांचे दर्शनही विद्यार्थ्यांना होते. १९ सप्टेंबर २०२१ला खांडला परिसरात जनावरे चारण्यासाठी गेलेल्या अनिल पांडुरंग सोनुले यांच्यावर पट्टेदार वाघाने हल्ला करुन त्यांना ठार केले. ही घटना ताजी असतानाच २२ सप्टेंबरला सकाळी १० वाजण्याच्या सुमारास सरांडी - खांडला या रस्त्यावर रामू चोधरी यांच्या शेताजवळील रस्त्यावर पट्टेदार वाघाने काही ग्रामस्थांना दर्शन दिले. तर २४ सप्टेंबरला सरांडीपासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या महादवाडी येथील उत्तम कोरांगे या शेतकऱ्यावर पट्टेदार वाघाने हल्ला करून जखमी केले. याचदिवशी वांगे नाला परिसरातून विद्यार्थी रस्त्याने जात असताना वाघ रस्त्यावर होता. वाघ पुढे गेल्यानंतर विद्यार्थी गावाकडे गेले. यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
बॉक्स
मिनी बस हाच पर्याय
या २६ किलोमीटरच्या रस्त्यावर दुचाकी सोडल्यास कोणतेही प्रवासी साधन चालत नाही. यापूर्वी बऱ्याच विद्यार्थ्यांनी शाळा सोडून जनावरे राखणे व शेती करणेच पसंत केले आहे. एकीकडे शासन शाळाबाह्य विद्यार्थी राहू नयेत, यासाठी प्रयत्न करते तर दुसरीकडे जीव मुठीत घेऊन विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचावे लागते. शासनाने या मार्गावर विद्यार्थ्यांसाठी मिनी बस सुरू करावी, अशी मागणी होत आहे.
कोट
मी नववीच्या वर्गात शिकत असून, दुपारची शाळा असते. शनिवारी सकाळची शाळा असल्याने घरातून सकाळी ६ वाजता अंधारातूनच निघावे लागते. काही दिवसांपूर्वी माझे वडील अनिल पांडुरंग सोनुले यांच्यावर पट्टेदार वाघाने हल्ला करुन ठार केले. या घटनेमुळे भीती अधिकच वाढली आहे.
- अनिकेत अनिल सोनुले, विद्यार्थी, खांडला.
250921\gfff.jpg
अशा घनदाट जंगलातुन विद्यार्थी शाळेला जातात