तळोधी (बा.): वनविकास महामंडळ वनपरिक्षेत्र कार्यालय बाळापूर अंतर्गत असलेल्या कक्ष क्र. ७३ येथील सावंगी फाट्याजवळच्या रस्त्यावर पट्टेदार वाघीण आपल्या बछड्यासह मागील ४८ तासांपासून ठाण मांडून आहे.वनविकास महामंडळ वनपरिक्षेत्र कार्यालय बाळापूर अंतर्गत असलेल्या कक्ष क्र. ७३ मध्ये मंगळवारी तीन बछड्यांना सोडून वाघीण बेपत्ता झाली होती. दुसऱ्या दिवशी ती परत आली. तेव्हापासून ती आपल्या बछड्यासह त्याच परिसरात आहे. वाघीण व तिच्या तीन बछड्यावर वनविकास महामंडळाचे अधिकारी दिवसरात्र लक्ष देवून आहेत. लोकांना तिथे जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. वाघिणीला जेरबंद करण्यासाठी वनविकास महामंडळातर्फे पिंजराही लावण्यात आला आहे. वाघिणीचे वास्तव्य असलेल्या ठिकाणापासून ५० मीटर अंतरावर पिंजरा बांधण्यात आलेला आहे. तिथे रेडा बांधून ठेवला आहे. तसेच वाघीण व बछड्यांच्या पिण्याच्या पाण्यासाठी वनविभागातर्फे पानवठेसुद्धा तयार करण्यात आलेले आहेत. या परिसरात वनविकास महामंडळातर्फे आजू-बाजूच्या परिसरात ११ कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. आज सायंकाळदरम्यान बांधलेल्या रेड्यावर वाघिणीने हल्ल्याचा प्रयत्न केला. मात्र रेड्याच्या ओरडण््यामुळे वाघीण पुन्हा परत गेली. रेड्यांच्या काही अंतरावर वाघीण ठाण मांडून बसली होती.याच परिसरात जंगलाला वनवा लागल्यामुळे वाघिणीला आपले पिल्ले सुरक्षितस्थळी हलविण्यास अडचण होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ती वाघीण गेल्या ४८ तासापासून रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या नाल्यात ठाण मांडून बसली आहे. वाघिणीने लोकांवर हल्ला करु नये, यासाठी वनविकास महामंडळातर्फे तळोधी बाळापूर रोड सकाळपासूनच पूर्णपणे बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे अनेक दुचाकी, चारचाकी व लग्न वऱ्हाड्यांना त्रास सहन करावा लागत आहे. घटनास्थळावर आज वनविभागाचे सहाय्यक उपवनसंरक्षक नन्नावरे, एफडीसीएमचे डीएफओ राजपूत व इतर अधिकारी तळ ठोकून होते. (वार्ताहर)
४८ तासांपासून वाघिणीचे बछड्यासह रस्त्यावर ठाण
By admin | Published: April 29, 2016 1:07 AM